मारेगाव : नगरपंचायतीची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. प्रचाराने जोर पडकला आहे. विविध पक्षांच्या दिग्गजांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची लढाई बनली असून एका-एका मतासाठी नेते मतदारांच्या घराचे उंबरठे झिजवताना दिसत आहे. मनसे वगळता इतर सर्वच पक्षांच्या राज्यस्तरीय नेत्यांनी प्रचाराकडे मात्र पाठ फिरविली आहे.यापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत फारसा रस न घेणाऱ्या वणी विधानसभा क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी यावर्षी येथील नगरपंचायतीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेना व काँग्रेसच्या दिग्गजांनी तर उमेदवारी वाटपापासूनच ढवळाढवळ करायला सुरूवात केली. त्यामुळे काही प्रभागात स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी पसरून बंडखोरी झाली आहे. त्यांच्या बंडखोरीचा परिणाम निकालावर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.वणी विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षांचे दिग्गज नेते एका-एका मतासाठी मतदारांच्या घराचे उंबरठे झिजवत आहे. काँग्रेसकडून माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे, पंचायत समितीच्या माजी सभापती अरूणा खंडाळकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांसह प्रचार सुरू आहे. प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन आमचा पक्ष निवडून आल्यास शहराचा विकास कसा करणार, हे ते समजावून सांगत आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नरेंद्र ठाकरे यांनी आम्ही स्वबळावर निवडून येऊ, असा दावा केला आहे.भाजपाने येथील नगरपंचायत निवडणुकीत ‘अच्छे दिन’ येणार, असा दावा केला आहे. तसा विश्वास स्थानिक नेत्यांमध्ये आहे. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार मतदारांच्या घरी जाऊन मतांचा जोगवा मागत आहे. या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही स्वबळावर सत्तेत येणार असल्याचा दावा ठोकला आहे. राष्ट्रवादीने तूर्तास निवडणुकीत अनपेक्षितपणे आघाडी घेतल्याचे दिसत आहे. निवडणूक घोषित होण्यापूर्वी राष्ट्रवादी स्पर्धेत टिकणार नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून संजय देरकर यांनी प्रचारात प्रचंड मेहनत घेऊन चुरस निर्माण केली आहे. त्यामुळे कुबड्यांच्या आधाराने आपण सत्तेत येवू, अशी आशा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. किमान पाच ते सहा जागा निश्चित मिळतील, अशी त्यांना अपेक्षा आहे. शिवसेना मात्र या निवडणुकीत अनपेक्षितपणे माघारल्याचे बोलले जात आहे. सुरूवातीला शिवसेनेकडे उमेदवारी मागणाऱ्यांची प्रचंड संख्या होती. त्यामुळे हा पक्ष पुन्हा सत्तेत येईल, असेच सर्वत्र बोलले जात होते. मात्र उमेदवारी वाटपावरून झालेले मतभेद आणि नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे शिवसेनेला ही निवडणूक जड जाण्याची चर्चा आहे. (शहर प्रतिनिधी)
नेते झिजवताहेत मतदारांच्या घरांचे उंबरठे
By admin | Updated: October 28, 2015 02:37 IST