सतीश येटरे - यवतमाळ एरव्ही मंत्र्यांच्या गाडीवर दिसणारा लाल अंबर दिवा यवतमाळात चक्क एका आॅटोमोबाईल व्यावसायिकाच्या खासगी वाहनावर लावला गेल्याचा धक्कादायक प्रकार सदर वाहनाच्या भीषण अपघातानंतर उघडकीस आला आहे. या प्रकरणी वायरलेसवरून अपघाताच्या मॅसेज पास होऊनही पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. टवाळखोर, मद्यपी आणि सुसाट वाहने हाकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त होता. मुख्य रस्त्यावरील प्रत्येक चौकात पोलीस आणि गस्त घालणारी त्यांची वाहने दिसत होती. त्यातच रात्री १ वाजता लाल अंबरदिवा लावलेली भरधाव ‘वरना’ कार आयुर्वेदिक महाविद्यालयाजवळील झाडावर धडकली. तीन पलट्या घेतल्याने वाहनाचा प्रचंड चुराडा झाला. आॅटोमोबाईल्स व्यावसायिकपुत्र असलेला वाहन चालक व त्याचे मित्र गंभीर जखमी झाले. या अपघाताचा मोठा आवाज झाल्याने स्थानिक नागरिक धावून गेले. यावेळी वाहन तसेच सोडून चालकासह त्याचे मित्र घटनास्थळाहून निघून गेले. तोवर नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. ठाण्यातून अथवा नियंत्रण कक्षातून या अपघाताचा वायरलेस मॅसेजही त्या भागात कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला पास करण्यात आला. त्यानंतर संबंधित पोलीस अधिकारी घटनास्थळावर पोहोचले. रात्री ३ वाजेपर्यंत क्षतिग्रस्त कार लाल रंगाच्या अंबरदिव्यासह तेथेच पडून होती. मात्र पोलीस पोहोचूनही या अपघाताची साधी नोंदही संबंधित पोलीस ठाण्यात अद्याप घेतली गेलेली नाही. लाल रंगाचा अंबरदिवा नेमका कसा लावला याची चौकशी तर दूरची बाब राहिली.
मंत्र्यांच्या गाडीवरील लालदिवा चक्क खासगी वाहनांवर
By admin | Updated: January 7, 2015 22:59 IST