लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाच्या धावत्या बसमध्ये यवतमाळ ते नेर प्रवासादरम्यान एका महिलेची प्रसूती होऊन तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. महिला वाहकाच्या प्रसंगावधानाने बाळ व बाळंतीण सुखरूप आहे.नेर आगाराची बस प्रवाशांना घेऊन सायंकाळी यवतमाळ वरून निघाली होती. मालखेड (खु.) गावाजवळ प्रवासी महिला सीताबाई देवराव तेहडे रा. तळेगाव दशासर जि. अमरावती हिला प्रसूती वेदना सुरु झाल्या. हा प्रकार बसची महिला वाहक रुक्माबाई मानोटकर यांच्या लक्षात आला. चालक अविनाश आंबेकर याला सांगून बस थांबविली. सर्व प्रवाशांना समोरच्या बाजूने करून थांबण्यास सांगितले. काही वेळातच सीताबाईने एका गोंडस मुलाला जन्म दिला. यानंतर बस नेर आगारात पोहोचली. तेथून बाळ व बाळंतीणीला बसने नेरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.सीताबाई आजारी असलेल्या आपल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी यवतमाळ येथे आली होती. तळेगावला जात असताना हा प्रकार घडला. वाहक रुक्माबाईच्या प्रसंगावधानाबद्दल आगार व्यवस्थापक दीप्ती वड्डे, आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके, वाहतूक निरीक्षक सचिन ढळे यांनी तिचे कौतुक केले.
यवतमाळ जिल्ह्यात परिवहन मंडळाच्या बसमध्ये महिला प्रसूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 13:16 IST
राज्य परिवहन महामंडळाच्या धावत्या बसमध्ये यवतमाळ ते नेर प्रवासादरम्यान एका महिलेची प्रसूती होऊन तिला पुत्ररत्न प्राप्त झाले.
यवतमाळ जिल्ह्यात परिवहन मंडळाच्या बसमध्ये महिला प्रसूत
ठळक मुद्देमहिला वाहकाचे प्रसंगावधानबाळ व बाळंतीण सुखरुप