बाजार समिती : सहा दिवसानंतरही माजी सभापतींविरूद्ध गुन्हा नाहीपुसद : शासन व बाजार समितीची दिशाभूल करणाऱ्या माजी सभापती अवचित रामू पवार यांच्याविरुद्ध २४ तासात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश सहायक निबंधक जी.एन. नाईक यांनी दिल्यानंतरही बाजार समितीच्या संचालक मंडळाने पाच दिवस लोटूनही माजी सभापतींविरुद्ध कारवाई न करता सहायक निबंधकांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली. त्यामुळे सहकार क्षेत्रातील गैरव्यवहाराला एक प्रकारे खतपाणी घालण्याचे काम पक्षश्रेष्ठींच्या आशीर्वादाने होत असल्याचा आरोप होत आहे. जिल्ह्यातील १७ कृषी उत्पन्न बाजार समितीतील ८०० गाळे भाडेपट्ट्याने दिल्याने समित्यांच्या प्रमुखांवर कारवाई करण्याबाबत विधानसभेत तारांकीत प्रश्न उपस्थित करण्यात आला. पुसदच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळा क्र. चार कल्पना अशोक जयस्वाल यांना व गाळ क्र. १९ प्रशांत प्रकाश पल्लेवार यांना अनुक्रमे वाईन शॉप व वाईन बारच्या व्यवसायासाठी दोन्ही गाळे केव्हा वितरित करण्यात आली, करारनाम केव्हा करण्यात आला यासंदर्भात १३ जुलै २०१५ रोजी बाजार समितीकडून खुलासा मागविण्यात आला होता. त्यानुसार बाजार समितीने दिलेल्या १४ जुलै २०१५ च्या खुलासा पत्रानुसार त्यात गाळा क्र. चार कल्पना अशोक जयस्वाल यांना वारसाहक्काने तबदिल करून सदर गाळा पाच वर्षासाठी भाडेपट्टा करार करून दिला आहे. या भाडे करारनाम्यामध्ये २७ आॅगस्ट २०१० रोजीच्या संचालक मंडळ सभेतील ठराव क्र. ३ (१)नुसार गाळा तबदिल करण्यात येत आहे असे नमुद केले आहे. परंतु २७ सप्टेंबर २०१० रोजी संचालक मंडळाच्या सभेतील ठराव क्र. ३ (१) नुसार सदर गाळा क्र. ४ भाड्याने देण्याविषयीचा कोणताही ठराव झालेला नाही, असे निदर्शनास आले आहे. हा करारनामा तत्कालिन सभापती अवचित पवार यांच्या स्वाक्षरीने करण्यात आला आहे. परंतु संचालक मंडळाच्या ३१ आॅक्टोबर १९९१ व २८ मे २०१३ नुसार मद्यपानगृहासाठी गाळे भाड्याने देण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश आहेत. तरी देखील माजी सभापती पवार यांनी संचालक मंडळाचा कोणताही ठराव नसताना करारनामा करून दिलेला आहे. एकंदरीत तत्कालिन सभापती शासनाची व बाजार समितीची फसवणूक केली आहे. तेव्हा महाराष्ट्र कृषी पणन अधिनियम १९६३ च्या कलम ४० (ई) नुसार प्राप्त अधिकारांन्वये पुसद येथील सहाय्यक निबंधक जी.एस. नाईक यांनी १६ जुलै २०१५ रोजी बाजार समितीचे सचिव, उपसभापती व संचालक मंडळाला दिलेल्या निर्देशात माजी सभापती अवचित पवार यांच्याविरुद्ध २४ तासाच्या आत गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. मात्र बाजार समितीने पाच ते सहा दिवस लोटल्यानंतरही माजी सभापतींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला नाही, ही बाब उघडकीस आली आहे. याबाबत बाजार समितीच्या सचिवांना विचारणा केली असता तत्कालिन सभापती अवचित पवार यांनी गाळा क्र. ४ बाबतचा ठराव २८ डिसेंबर २०११ रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला होता. तशी ठरावबुकात नोंद आहे. याबाबत त्यांनी सहायक निबंधकांना पत्र दिले आहे. तसेच माजी सभापतींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची निर्देश मिळाले असल्याबाबत उपसभापती व संचालक मंडळाला पत्र दाखविल्यानंतरही त्यांनी कोणताही अभिप्राय दिला नसल्याने आपणाला गुन्हा दाखल करण्याचा अधिकार आहे का, याबाबत सहायक निबंधकांच्या २० जुलै २०१५ रोजी दिलेल्या पत्रातून विचारणा केली आहे. त्यांच्या निर्देशानंतरच पुढील कारवाई होईल असे बाजार समितीचे सचिव मनीष अग्रवाल यांनी सांगितले आहे. (तालुका प्रतिनिधी)
सहायक निबंधकाच्या आदेशाला केराची टोपली
By admin | Updated: July 23, 2015 02:32 IST