वणी : केंद्र सरकारने नुकताच करंजी-वणी ते वरोरा-चंद्रपूर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास ४० किलोमीटरचा भाग समाविष्ट आहे.केंद्र सरकारच्या परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने या संदर्भात नुकतीच घोषणा केली. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील करंजीपासून वणी, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, मूल, गडचिरोली, धानोरामार्गे हा राष्ट्रीय महामार्ग छत्तीसगड राज्याला जोडला जाणार आहे. या महामार्गाला ९३0 क्रमांक देण्यात आला आहे. हा राष्ट्रीय महामार्ग जवळपास २८0 किलोमीटरचा राहणार आहे. त्यापैकी जवळपास ४0 किलोमीटरचा रस्ता यवतमाळ जिल्ह्यातून जाणार आहे. सध्या करंजी ते घुग्गुस-चंद्रपूर रस्त्याचे चौपदरीकरण सुरू आहे. मात्र हे काम अतिशय संथगतीने होत आहे. आता याच मार्गातील करंजी-मारेगाव ते वणी हा मार्ग नवीन राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट होणार आहे. त्यामुळे चौपदरीकरणाचे रखडलेले काम त्वरित मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वणीपासून समोर वररोरापर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. तथापि वणी ते घुग्गस व समोर चंद्रपूरपर्यंतचा मार्ग या राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट नाही. या नवीन राष्ट्रीय महामार्गात करंजी ते वणी हा ३२ किलोमीटरचा आणि वणी ते पाटाळापर्यंतचा आठ किलोमीटरचा मार्ग समाविष्ट आहे. जिल्ह्यातील ४0 किलोमीटरचा या राष्ट्रीय महामार्गात समावेश असणार आहे. सध्या वणी ते वरोरा या २५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
करंजी-वणी-चंद्रपूर महामार्ग
By admin | Updated: January 24, 2015 02:02 IST