मृतदेह शवागारात : जन्मदात्या माऊलीची २० एकर जमीन विकल्यानंतर लेकीनेच नाकारले सुरेंद्र राऊत । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : एकुलत्या एक लेकीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. शिक्षक मुलगा पाहून लग्नही लावून दिले. मुलीचा सुखी संसार पाहून डोळे मिटण्याची अंतिम इच्छा. मात्र लेकीने आईची शेती विकून तिला घराबाहेर काढले. दुसऱ्याच्या ओसरीत आश्रय घेतला. आजारी पडल्याने तिला गावकऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर लेक येईल, अंत्यसंस्कार करेल अशी आशा होती. परंतु जीवंतपणी बेदखल केलेल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठीही लेकीचे हृदय द्रवले नाही. सध्या तिचा मृतदेह यवतमाळच्या शवागारात अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत आहे. ही कहाणी आहे राळेगाव येथील कमलाबाईची. कळंब तालुक्यातील सावरगावची मुळची रहिवासी. त्यांना एकुलती एक लेक आहे. या लेकीसाठी त्यांनी जीवाचे रान केले. शिक्षक मुलगा शोधून लग्न अगदी थाटामाटात लावून दिले. लेकीचा सुखाचा संसार सुरू झाला. काही वर्षांनी वृद्धापकाळात आधार म्हणून कमलाबाई व पती नानाजी राळेगाव येथील विठ्ठल मंदिरालगत राहणाऱ्या लेकीकडे राहावयास गेली. कमलाबाईच्या नावावर थोडीथोडकी नव्हे २० एकर जमीन होती. गोड बोलून जावई व लेकीने २० एकर शेती विकण्यास भाग पाडले. यानंतर या दोघांचेही हाल सुरू झाले. बेवारस स्थितीत नानाजीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कमलाबाईच्या नशिबीसुद्धा याच यातना आल्या. पोटच्या लेकीने तिला चक्क घराबाहेर काढले. अशा परिस्थितीत कमलाबाईला एका सुज्ञ नागरिकाने आश्रय दिला. त्यांच्या ओसरीत तिने मुक्काम ठोकला. मात्र वृद्धापकाळाने तिची प्रकृती खालावली. तिला यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दाखल करताना कमलाबाई ऐवजी कलावती पटेलपैक असे नाव नोंदविण्यात आले. मेडिकलच्या समाजसेवकाने तिची आस्थेने चौकशी केली तेव्हा तिने आपले नाव कमलाबाई असल्याचे सांगितले होते. उपचार सुरू असताना सोमवारी तिचा मृत्यू झाला. ही माहिती पोलिसांनी मुलगी व जावयापर्यंत पोहोचविली. मात्र त्यांनी आमचा त्या वृद्ध महिलेशी काही संबंध नसून आर्थिक परिस्थिती नसल्याने अंत्यसंस्कारासाठीही पोलिसांपुढे असमर्थता दर्शविली. जगण्याने छळले होते... ‘जगण्याने छळले होते, मृत्यूने केली सुटका’ अशी सुरेश भटांची कविता आहे. मात्र कमलाबाईच्या नशिबी मृत्यूनंतरही सुटका दिसत नाही. जिवंतपणी मरणयातना भोगल्यानंतर मृत्यूनंतरही तिचा मृतदेह शवागारात ठेवावा लागले. कायदेशीरदृष्ट्या नातेवाईकांचा शोध लागला नाही तर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करण्याची तरतूद आहे. परंतु येथे कमलाबाईची मुलगी आहे. तिला पोलिसांनी शोधून काढले. परंतु मुलीनेच तिला चक्क नाकारले.
कमलाबाई, जिवंतपणी बेदखल, मृत्यूनंतर बेवारस
By admin | Updated: May 18, 2017 00:50 IST