जवाहरलाल दर्डा स्मृती समारोहयवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या १७ व्या स्मृती समारोहानिमित्त संगीत संध्या २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता बाबूजींचे समाधीस्थळ प्रेरणास्थळावर आयोजित आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सितार वादक पंडित बुद्धदित्य मुखर्जी आणि प्रसिद्ध तबला वादक पंडित सौमेन नंदी यांची जुगलबंदी रंगणार आहे. बाबूजींच्या स्मृती समारोहानिमित्त दरवर्षी यवतमाळकर रसिकांना संगीताची मेजवाणी असते. यावर्षी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर आपल्या खास शैलीच्या सितार वादनाने श्रोत्यांवर अमिट छाप सोडणारे बुद्धदित्य मुखर्जी सितार वादन करणार आहे. इमदादखानी घराण्याचे सितार वादक असलेल्या पंडित मुखर्जी यांनी वयाच्या पाचव्या वर्षीपासूनच संगीत साधनेला प्रारंभ केला. वडील पंडित भीमालेन्दू मुखर्जी यांच्याकडून त्यांनी वादनाचे धडे घेतले. तेच त्यांचे गुरू आहेत. गायकीच्या अंगाने सितार वादन करणे हे बुद्धदित्य मुखर्जी यांचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच त्यांची संगीत क्षेत्रात वेगळी ओळख आहे. आतापर्यंत विविध २६ देशांमध्ये त्यांच्या सितार वादनाचे कार्यक्रम झाले आहेत. ३० जून १९९० मध्ये लंडनच्या हाऊस आॅफ कॉमन्समध्ये त्यांच्या सितार वादनाचा अविस्मरणीय कार्यक्रम झाला होता. संगीत नाटक अकादमी अवॉर्डने सन्मानित पंडित बुद्धदित्य मुखर्जी यवतमाळकर श्रोत्यांना सितार वादनाने मंत्रमुग्ध करणार आहेत.त्यांच्यासोबत प्रसिद्ध तबला वादक पंडित सौमेन नंदी आपल्या जादूई बोटांनी यवतमाळकर रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहे. सौमेन नंदी यांना शास्त्रीय संगीताचा वारसा लाभला आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांनी तबला वादनाला प्रारंभ केला. पंडित पंकज चटर्जींच्या तालमीत ते वाढले. त्यानंतर पंडित अरुप चटर्जी यांच्याकडून त्यांनी तबल्यातील बारकावे शिकून घेतले. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे नियमित कलावंत असलेल्या सौमेन नंदी यांना भारत सरकारची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आहे. सितार वादन पंडित बुद्धदित्य मुखर्जी यांच्यासोबत त्यांनी विविध कार्यक्रम सादर केले आहेत. कोलकाता येथे आयोजित तानसेन संगीत समारोहात शामल चटर्जीसोबत तबला वादन केले. सौमेन नंदी यांची तबला वादनाची शैली अत्यंत वेगळी असून ती सर्वांना मंत्रमुग्ध करणारी आहे. सितार आणि तबल्याची जुगलबंदी यवतमाळकर रसिकांना मोहिनी घालणार आहे. (नगर प्रतिनिधी)
सितार व तबल्याची रंगणार जुगलबंदी
By admin | Updated: November 22, 2014 23:09 IST