यवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी चेतन दिनेशराव भिवगडे याचा संयुक्त अरब अमिरातेतील अबुधाबी येथे सन्मान करण्यात आला. विज्ञान, तंत्रज्ञान व व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय परिषदेत चेतनने सादर केलेला शोधनिबंध उत्कृष्ट ठरला. याबद्दल त्याला गौरविण्यात आले. या परिषदेमध्ये संपूर्ण जगातून विज्ञान, तंत्रज्ञान व व्यवस्थापन क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यातील शेवटच्या फेरीमध्ये सहा शोधनिबंधांची निवड करण्यात आली. त्यामध्ये चेतन हा भारतातील एकमेव विद्यार्थी होता. अंतिम फेरीतून सर्वोत्कृष्ट शोधनिबंध म्हणून चेतन भिवगडेच्या शोधनिबंधाची निवड करण्यात आली. अबुधाबीच्या चान्सलरच्या हस्ते त्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला. या परिषदेत सहभाग घेण्यासाठी ‘जेडीआयईटी’ने नोंदणी फी आणि चेतनला अबुधाबी येथे जाण्यासाठीचा सर्व खर्चाचा भार उचलला होता. होतकरू विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ‘जेडीआयईटी’तर्फे प्रोत्साहन दिले जाते. सोबतच आर्थिक सहकार्यही करण्यात येते. चेतनला शोधनिबंधासाठी प्रा. सागर गड्डमवार, विभाग प्रमुख डॉ. अतुल बोराडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाचे संस्थेचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी कौतुक केले. (वार्ताहर)
‘जेडीआयईटी’च्या चेतनचा अबुधाबी येथे सन्मान
By admin | Updated: October 10, 2016 01:56 IST