बदल्यांसाठी गावांची अस्मिता पणाला : शिक्षकांच्या हिशेबाने गावकरी अचंब्यात लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचा हंगाम आला की ‘वाद’ नवा नसतो. पण यंदाच्या बदल्यांमध्ये कारण नसताना खेडेगावांची ‘ओळख’ पणाला लागली आहे. बदलीस इच्छूक बहुतांश शिक्षक आपले गाव ‘अवघड’च असल्याचा दावा करीत आहे. पण आपल्या गावापर्यंत रस्ता येतो, मग ते अवघड कसे? असा निरागस प्रश्न गावकऱ्यांना पडत आहे. शिक्षकांच्या बदल्या करताना यंदा संपूर्ण जिल्ह्यातील गावांची दोन तऱ्हेने विभागणी करण्यात येत आहे. अवघड क्षेत्र आणि सर्वसाधारण क्षेत्र. अवघड क्षेत्रात मोडणाऱ्या गावातील शिक्षकाची केवळ तीन वर्षांची सेवा झालेली असेल तरी तो बदलीस पात्र ठरणार आहे. तर सर्वसाधारण क्षेत्रातील शिक्षकाला १० वर्षांची सेवा झाल्याविना बदलीची संधी नाही. मुख्य म्हणजे, अवघड क्षेत्रातील गाव कसे ठरवावे, याचा निश्चित निकष शासनाने ठरवून दिलेला नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतील ते गाव अवघड, अशी परिस्थिती आहे. त्याच वेळी बदलीसाठी अनेक वर्षांपासून वाट पाहात असलेल्या शिक्षकांची संख्या मात्र मोठी आहे. त्यामुळे आपल्या शाळेचे गाव ‘अवघड क्षेत्रात’ यावे यासाठी शिक्षकांची धडपड सुरू आहे. वास्तविक, ज्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी दळणवळणाची सोय नाही, रस्ता नाही, परिवहन महामंडळाची बस जात नाही, शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे, अशा गावांचा समावेश अवघड क्षेत्रात होण्याची गरज आहे. परंतु, ज्या गावांचे अंतर तालुकास्थळापासून खूप जास्त आहे, अशीच गावे अवघड क्षेत्रात घेण्यासाठी शिक्षक आग्रही आहेत. कारण अशा गावांमध्ये शिक्षकांना दररोज ‘अप-डाउन’ करणे शक्य होत नाही. वास्तविक, ही गावे दूर असली तरी तेथे डांबरी रस्ता पोहोचलेला आहे, नियमित बस जाते. त्यामुळे तेथील सामान्य गावकरी मात्र आपल्या गावाला ‘सर्वसाधारण क्षेत्रा’ गाव मानतात. पण गावचे गुरुजी मात्र त्याच गावाला ‘अवघड’ ठरविण्याचा मागे लागले आहेत.
‘अप-डाउन’ करणे अशक्य, तेच गाव म्हणा अवघड !
By admin | Updated: May 14, 2017 01:14 IST