लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्याची चूक नसताना त्याच्या कुटुंबाला भरपाई नाकारणे दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला भोवले. शेकलगाव (ता. आर्णी) येथील रेश्मा जाधव या महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवर यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने या विमा कंपनीला चपराक दिली. दोन लाख रुपये आठ टक्के व्याजासह देण्यात यावे, असा आदेश देण्यात आला आहे.
रेश्मा मनोज जाधव यांचे पती मनोज जाधव यांचा दुचाकीने प्रवास करताना कारच्या धडकेत मृत्यू झाला. ते शेतकरी होते. गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेअंतर्गत लाभासाठी दावा करण्यात आला. मात्र, मनोज जाधव यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता असे कारण देत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने भरपाई नाकारली होती. त्यामुळे रेश्मा जाधव यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात धाव घेतली. ग्राहक आयोगाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र उल्हास मराठे, सदस्य अमृता वैद्य यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर सुनावणी झाली. विमाधारकाची चूक नसेल आणि दुसरे वाहन अपघातास कारणीभूत असेल, अशा परिस्थितीत विमाधारकाच्या कुटुंबाला भरपाई मिळाली पाहिजे, असे नमूद करत आयोगाने रेश्मा जाधव यांच्या बाजूने निर्णय दिला आहे.
आठ टक्के व्याजासह भरपाईगोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत रेश्मा जाधव यांना विमा दाव्याचे दोन लाख रुपये आठ टक्के व्याजासह द्यावे, मानसिक त्रासापोटी दहा हजार आणि तक्रार खर्चाचे पाच हजार रुपये द्यावे, असा आदेश आयोगाने दिला आहे.
चारचाकी वाहनच कारणीभूतविमाधारक मनोज जाधव यांच्या अपघाती मृत्यूला विरुद्ध दिशेने येत असलेले चारचाकी वाहन कारणीभूत आहे. दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीनेही ही बाब नाकारली नाही, असे आयोगाने निकालपत्रात नमूद केले आहे. त्यामुळे तक्रारदार विमा दाव्यास पात्र ठरतो, असे म्हटले आहे.