पवन लताड लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यात काही खासगी बँका व पतसंस्थामधील अपहार आणि घोटाळे समोर आले. याची व्याप्ती २९० कोटींच्या घरात आहे. यामुळे ठेवीदार धास्तावून गेले आहे. यातूनच सहकार विभाग अॅक्शन मोडवर आला आहे. ११५ पतसंस्था आणि तीन बँकांची विशेष तपासणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
यवतमाळातील बाबाजी दाते महिला अर्बन बँक, पुसद येथील संत सेवालाल महाराज सहकारी पतसंस्था, ढाणकी येथील राजस्थानी मल्टीस्टेट को. ऑपरेटिव्ह सोसायटी आणि दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड या चार संस्थांमधील अपहार आणि कर्ज घोटाळे चांगलेच गाजत आहे. यापैकी तीन प्रकरणात गुन्हेही दाखल आहे. दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधीचे प्रकरण सध्या डंक्यावर आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घातले आहे. पोलिस विभागही चौफेर तपास करीत आहे. जिल्ह्यात यापूर्वी राळेगाव येथील महिला ग्रामीण बँक, आर्णीतील भगवान शेतकरी पतसंस्था, यवतमाळातील संत गाडगेबाबा पतसंस्था, घाटंजीची एक पतसंस्था, ढोकेश्वर मल्टीस्टेट, हिराचंद रायसोनी या संस्थांनीही खातेदारांची फसवणूक केली. परंतु, ठोस कारवाई न झाल्याने ठेवीदारांची न्यायासाठी प्रतीक्षा कायम आहे. अपहाराची मालिकाच सुरू असल्याने सहकार विभाग कामाला लागला.
कुणाचा 'एनपीए' किती ? याचा लेखाजोखा घेणार जिल्ह्यातील बहुतांश खासगी बँका आणि पतसंस्थांचा एनपीए वाढलेला असल्याची चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. बाबाजी दाते महिला अर्बन बँकेच्या बाबतीत 'एनपीए'कडे दुर्लक्ष केले गेले होते. यामुळेच अपहाराची व्याप्ती वाढल्याची ओरड आजही ऐकायला मिळते. सहकार विभागाच्या विशेष तपासणीत कुठल्या बँक, पतसंस्थेचा किती 'एनपीए' आहे, ही बाबही समोर येणार आहे.
सर्वसामान्य ठेवीदारांपुढेच येतो पेच२९० कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. एकदा फसलेला पैसा परत मिळविण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. ठेवीदार यामुळे अडचणीत येत आहेत.
बँका व पतसंस्थांची होणार तपासणी सर्व बँका आणि पतसंस्थांची विशेष तपासणी मोहीम राबविण्याच्या हालचाली सहकार विभागाने सुरू केल्या आहेत.
नियामक मंडळाच्या कलम १४४ वर फोकस खासगी बँका व पतसंस्थांनी नियामक मंडळ कलम १४४ ची पूर्तता करणे गरजेचे आहे. याची पूर्तता केली जात आहे किंवा नाही, याची तपासणी या विशेष मोहिमेत केली जाणार आहे. यात दोषी आढळलेल्या बँका व पतसंस्थांवर कारवाई करण्यासंबंधी पाऊल उचलण्यात येणार आहे. तसेच कर्ज वाटप प्रक्रिया, गहाण असलेली संपत्ती आणि दिलेल्या कर्जाचा ताळमेळ, ठेवी, ऑडिट याचीही तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे.
"सहकार विभागाकडून बँका व पतसंस्थांची विशेष तपासणी करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. याबाबत लवकरच सर्वच संस्थांच्या तपासणीचे आदेश काढले जातील. त्यासाठी लेखा परीक्षकांचे पथक तयार केले जात आहे."- नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक यवतमाळ