यवतमाळ : भांडणानंतर तरुणाला बांधून विहिरीत टाकून ठार मारणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जावेद खान सुलतान खान रा. कळंब असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर विजय यादवराव निशाणदार असे मृताचे नाव आहे. कळंब येथील जावेद खान सुलतान खान आणि विजय यादवराव निशाणदार यांच्यात घनिष्ठ परिचय होता. जावेद हा विजयची पत्नी सुनीताला आर्थिक मदत करीत होता. २८ डिसेंबर २०१३ रोजी जावेदने विजयच्या पत्नीला पहाटे ४.३० वाजता भेटायला बोलाविले होते. ते दोघे बोलत असताना विजय तेथे पोहोचला. त्यावरून या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. जावेदने विजयला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याला दोराने बांधले. मोटरसायकलवरून शिंगणापूर मार्गावरील एका शेतात नेले. आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून विजयला शेतातील विहिरीत ढकलून दिले. यात विजयचा मृत्यू झाला. त्यानंतर पत्नी सुनीताने कळंब पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. जावेद खान सुलतान खान याला अटक करून गुन्हा दाखल केला. तसेच प्रकरण न्यायप्रविषट केले. मृत विजयची पत्नी सुनीताच्या मुख्य साक्षीसह इतर साक्षीवरून जावेद खान याच्याविरुद्ध आरोप सिद्ध झाल्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सविता बारणे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे अॅड. निती दवे यांनी काम पाहिले.
खुनात जन्मठेप
By admin | Updated: December 6, 2014 02:00 IST