पुसद : शहरात अवकाळी पाऊस आणि ढगाळी वातावरणानंतर आता गेल्या तीन-चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. पुसदचे तापमान ३८ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. तापमानात वाढ होत असली तरीदेखील साथीच्या आजारांचा प्रकोप कायमच असून दिवसागणिक सर्दी, ताप, खोकला, निमोनिया आदी आजारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यावर्षी नवीन वर्षाच्या प्रारंभापासून अर्थात जानेवारीच्या सुरुवातीपासूनच पुसद तालुक्यात साथीच्या आजाराने चांगलेच मूळ धरले आहे. अलिकडच्या काळात तर याचे रूपांतर स्वाईन फ्यूमध्ये होवून तीन रुग्ण दगावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आता सर्वत्र तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे साथीच्या आजाराला पायबंद बसू शकतो, असे जाणकारांचे मत आहे. परंतु सध्या तरी तसे होताना दिसत नाही. सध्या तीव्र तापमानाला सुरुवात झाली आहे. रात्री उशिरापर्यंत उकाडा जाणवत आहे. दुपारी बाहेर फिरताना नागरिक टोपी, रूमाल, शेले आदींचा वापर करताना दिसत आहे. तालुक्यातील जलस्त्रोतांची पातळीही चांगलीच खालावली आहे. त्यामुळे आतापासूनच ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके जाणवत आहे. महिलांच्या डोक्यावर पाण्याचे हांडे दिसत आहे. पाणीटंचाईची शक्यता पाहता महसूल व पंचायत समिती प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. एकंदरित उन्हाची तीव्रता वाढली तरी खासगी रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये साथीच्या आजारांचे रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण थांबत नसल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)