लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भोंदू मांत्रिकाने महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीला घरात डांबून वर्षभर अघोरी उपचार केल्याचा गंभीर प्रकार सोमवारी सायंकाळी उघडकीस आला. पोलिसांनी माय-लेकीची सुटका केली असून, भोंदू मांत्रिक महादेव पालवेचे एक-एक प्रकरण आता पुढे येत आहे, मांत्रिकाच्या घरात दोन कोंबडे, लव बईस, फिंच पक्षी, पामेलियन कुत्रा असे पाळीव प्राणी आढळले. बी-काइंड संस्थेच्या मदतीने या प्राण्यांची सुटका करण्यात आली.
भोंदू मांत्रिकाच्या घरातील प्राण्यांची दयनीय अवस्था लक्षात आल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद सरकटे, किरण पडघन, प्रदीप कुरटकर यांनी तत्काळ प्राण्यांसाठी कार्यरत संस्थेशी संपर्क साधला. कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत बेवारस आणि उपाशी प्राण्यांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. यावेळी अमोघ वोरा, सौरभ नाहर, अभिजित गुल्हाने, कृष्णा गंभिरे, निशांत सायरे, प्रसाद बाजपेयी उपस्थित होते. घरामध्ये आढळून आलेले दोन गावरान कोंबडे, दोन लव बर्डस्, आणि एक फिंच पक्षी यांची जबाबदारी पंकज उगले यांनी तर एका पामेलियन जातीच्या कुत्र्याची जबाबदारी स्नेहा पट्टेवार यांनी स्वीकारली. घरमालक परत येईपर्यंत हे सर्व प्राणी संस्थेच्या ताब्यात राहतील आणि त्यांच्या पुनर्प्राप्तीनंतर ते पुन्हा मालकाच्या स्वाधीन केले जातील. एका निर्दय घटनेच्या सावलीत अडकलेल्या या निरागस जीवांना जीवदान मिळाले आहे. मांत्रिकाच्या घरातून यापूर्वीच अघोरी पूजेच्या साहित्यासह रोख रक्कम व सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. मांत्रिकाच्या घरात असलेल्या खड्याचे व पूजा मांडलेल्या जागेचे उत्खनन केले जाणार आहे. मांत्रिकाची प्रकृती सुधारताच पोलिस त्याला रुग्णालयातून ताब्यात घेऊन पुन्हा एकदा घरात सर्च करणार आहे.
मांत्रिक रुग्णालयातच; पोलिसांचा वॉच
- पोलिसांनी धाड टाकून महिला व तिच्या मुलीची सुटका केल्यानंतर भोंदू महादेव पालवे याने स्वतःच्या हाताने गळा चिरून घेतला होता. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- डॉक्टरांनी प्रकृतीत सुधारणा झाल्याचे प्रमाणपत्र देताच भोंदूला अटक केली जाणार आहे. मात्र, बुधवारीही मांत्रिकावर उपचार सुरूच होते. पोलिसांचा रुग्णालयात खडा पहारा असून, मांत्रिकाला अटक होताच अनेक बाबी समोर येणार आहेत.