लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नवीन जलधोरणामुळे रेती उपशावर बंदी आहे. नवीन रेती घाटांचा लिलाव थांबला आहे. याचा फायदा घेत रेतीमाफियांनी घेत रेतीघाटावर मिळणार नाही इतका साठा यवतमाळ शहराच्या चारही बाजूने केला आहे. जणू कृत्रिम रेतीघाट तयार केल्याचे चित्र पहावयास मिळते. याकडे महसूल प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. रेतीसाठ्याबाबत स्पष्ट शासन आदेश असतानाही कारवाई होत नाही.भोसा परिसरात सर्वाधिक साठे दिसतात. रेतीमाफियांनी खुले ले-आऊट, अतिक्रमित जागा, हायवेलगतचा परिसर अशा ठिकाणी रेतीचे साठे केले आहे. यानंतरही तहसील प्रशासन गप्प आहे. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या यवतमाळात महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून माफियांनी साठे ठेवले आहे. याकरिता शहराच्या भोवताल रेती माफियांचे जाळे पहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी रेतीचे साठे ठेवण्यात आले, त्या ठिकाणी सर्वसामान्याला पोहचता येत नाही. खुले ले-आऊट, बेवारस जागांवर असे साठे ठेवण्यात आले आहे. यामुळे कारवाई झाली तरी ही रेती आमची नाही, असे म्हणण्यासाठी रेतीमाफिया मोकळे राहणार आहे.तहसील प्रशासनाने खुल्या जागेवरील सर्व रेतीचे साठे जप्त करण्याची गरज आहे. मात्र प्रशासनाने अद्यापही कारवाई केली नाही. विशेष म्हणजे, भोसा परिसरात आणि पिंपळगाव, वाघापूर भागातही रेतीचे साठे आहे. घाटंजी बायपासला लागून चौफुलीजवळ मोठा रेतीचा साठा आहे. याच हायवेवरील चापडोह तलावाजवळून रेतीची ये-जा होते. भरदिवसा या ठिकाणावरून रेती भरली जाते. विशेष म्हणजे, पोलिसांच्या चौकीचेच हे ठिकाण आहे. शहरातील ‘ओपन स्पेस’ आणि शासकीय जागेवर हे रेतीसाठे ठेवण्यात आले आहे. तर काही भागात रेतीचा उपसा करणाऱ्या बोटही खुलेआम ठेवल्या आहेत.लाखोंचा महसूल बुडलारेती घाटांचा लिलाव न झाल्याने रेतीमाफियांनी चोरीच्या मार्गाने आणलेली रेती शहरात खुल्या जागेवर ठेवली आहे. चौपट दरात विक्री होत आहे. यातून रेतीमाफिया गब्बर झाले आहेत. तर दुसरीकडे सुरक्षा न केल्याने शासनाच्या तिजोरीला मोठा फटका बसला आहे.महसूल विभागातूनच कारवाईची खबरबंदीच्या काळात रेती माफियांचा मुक्त संचार सुरू आहे. या माफियांच्या सोबत स्थानिक महसूल यंत्रणेतील एका महाभागाने आपली भागीदारी केली आहे. त्यामुळे कारवाईच्या संदर्भात कुठलीही हालचाल यंत्रणेकडून होत असेल तर याची पूर्वसूचना सोईस्करपणे आपल्या भागीदार रेती माफियांना दिली जाते. काही दिवसापूर्वी यवतमाळ तालुक्याबाहेरील रेती ट्रकवर कारवाई झाली, त्यातही मापात पाप करीत आपल्या जवळच्या ट्रकला कमी दंड तर इतरांवर दाम दुप्पट दंड आकारले. हा प्रकार वरिष्ठांच्या धूळफेक करून सुरू आहे.घरकुलास मोफत रेती द्याशहरातील साठ्यांवर धाडी टाकून जप्त रेती घरकुलास दिल्यास गरीब लाभार्थ्यांना मदत होईल. लिलाव प्रक्रियेनंतर पुन्हा माफियाकडेच जाणारी रेती थांबेल. यापेक्षा घरकुल धारकांना रेती द्या, अशी मागणी आता पुढे येत आहे.
शहरातच माफियांचे अवैध रेतीघाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST
भोसा परिसरात सर्वाधिक साठे दिसतात. रेतीमाफियांनी खुले ले-आऊट, अतिक्रमित जागा, हायवेलगतचा परिसर अशा ठिकाणी रेतीचे साठे केले आहे. यानंतरही तहसील प्रशासन गप्प आहे. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या यवतमाळात महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून माफियांनी साठे ठेवले आहे. याकरिता शहराच्या भोवताल रेती माफियांचे जाळे पहायला मिळत आहे.
शहरातच माफियांचे अवैध रेतीघाट
ठळक मुद्देतहसील प्रशासनाची मेहेरनजर : दोन वर्षापूर्वीच्या शासन आदेशाची पायमल्ली, राजरोस भरतात ट्रक-टिप्पर