नियमाला फाटा : उलाढालीमध्ये दलालांच्याच प्रस्तावाची चलतीपुसद : दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालय नगररचना कायदा आणि बांधकाम नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करून भूखंडांचे खरेदी-विक्री व्यवहार सर्रास सुरू आहेत. भुमाफियांच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीला मार्गदर्शन आणि सहकार्य याच कार्यालयातून होत आहे. त्यामुळे भविष्यात अनेक समस्या निर्माण होणार आहेत. महसूल विभाग याकडे डोळेझाक करीत आहे. पुसद तालुक्यात नागरीकरण वाढत आहे. नगरपालिका आणि ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती निर्माण होत आहे. या स्थितीचा फायदा घेण्यासाठी भूमाफिया सरसावले आहेत. पैशाच्या जोरावर कायद्याची पायमल्ली करून जमिनीचे भूखंड आणि उपखंड करून विकले जात आहेत. कृषी वापरातील जमिनी अकृषीसाठी उपयोगात आणल्या जात असून, यासाठी आवश्यक असणारी अकृषक परवाण्याची विहीत पद्धती अनुसरण्यात येत नाही. शहरी क्षेत्रात सहायक संचालक नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रात राज्य शसनाचे सहायक संचालक नगररचना यांचा अंतिम अभिन्यास (ले-आऊट) मंजूर असल्याशिवाय भूखंड खरेदी-विक्री व्यवहाराची नोंदणी करू नये, अश्ी अट आहे. मात्र पुसदच्या दस्त नोंदणी कार्यालयात या नियमाला फाटा देऊन नोंदण्या होत आहेत. महाराष्ट्र जमीन महसुलाचे कलम ४४ नुसार ज्या प्रयोजनाच्या वापराला अकृषक परवानगी दिली आहे. अशांचा वापर एका वर्षाच्या आत न केल्याचे उघडकीस झाल्यास त्याची दस्त नोंदणी दुय्यम निबंधकांनी करू नये, अशी कायद्यात तरतूद आहे. परंतु पुसद कार्यालयात भूखंड माफिया आपले वजन वापरून सर्रास खरेदी विक्रीच्या नोंदी करीत आहेत. या बेकायदेशीर व्यवहारामुळे खुली जागा (ओपन स्पेस) न ठेवणे, अभिन्यास बदलणे, अंतर्गत रस्ते, मर्यादापेक्षा कमी रुंदीचे ठेवणे असे प्रकार दिसत आहेत. भूखंड खरेदी करणाऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येवूनही काहीच करता येत नाही. कारण भूखंड विक्री करणारे दडपशाहीचा वापर करतात. महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर निर्बंध घालावेत अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
पुसदमध्ये भूखंडांची बेकायदा खरेदी-विक्री
By admin | Updated: January 3, 2015 23:10 IST