बाभूळगाव : लोकसंख्येच्या गणितासाठी विद्यार्थीही यादीतआरिफ अली बाभूळगावकोणत्याही निवडणुकीत वॉर्ड रचनेला महत्त्व असते. त्यावरच उमेदवाराच्या विजयाचे गणित अवलंबून असते. मात्र बाभूळगाव नगरपंचायतीसाठी नव्याने करण्यात आलेल्या वॉर्डरचनेत प्रचंड अनागोंदी दिसत आहे. एका वॉर्डात तर केवळ ९१ मतदार आहे. वॉर्डाची भौगोलिक रचनेच्या आधारे विभागणी करीत असताना निर्धारित लोकसंख्येचे गणितच संबंधित अधिकाऱ्यांना जुळविता आले नाही. त्यामुळे एकाच कुटुंबातील व्यक्तींची मते वेगवेगळ्या वॉर्डात गेली आहे. नव्यानेच अस्तित्वात आलेल्या नगरपंचायती सदस्यसंख्या १७ झाली आहे. त्यासाठी वॉर्डाची रचना करण्यात आली. काही ठिकाणी तर वॉर्डरचना करताना चक्क लोकसंख्येचा निकष पूर्ण करण्यासाठी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना निवासी नागरिक म्हणून दाखविण्यात आले आहे. या अनागोंदीमुळे बाभूळगावची नगरपंचायत निवडणूकच वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. आता वॉर्डरचनेत झालेली चूक ऐनवेळेवर निदर्शनास आल्याने निवडणूक विभागापुढेही प्रश्न निर्माण झाला आहे. अनागोंदीचा कळस म्हणजे ज्या वॉर्डात एकही अनुसूचित जमातीचे कुटुंब नाही अशा वॉर्डात चक्क अनुसूचित जमातीसाठी आरक्षण देण्यात आले आहे. वॉर्ड क्र.१३ मध्ये एकूण मतदारसंख्या ९१ असून त्यामध्ये मुस्लिमांची ८१ आणि अनुसूचित जातीची १० मते आहेत आणि हा वॉर्ड अनुसूचित जमातीसाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. यावरून निवडणूक विभागाने वॉर्ड फार्मेशन आणि मतदारयादीचे केलेले काम हे केवळ टेबलवर बसूनच पूर्ण केले असावे, असा आरोप स्थानिक इच्छूक उमेदवारांकडून केला जात आहे. बाभूळगाव ग्रामपंचायत अस्तित्वात असताना सदस्यसंख्या १३ होती. नगरपंचायतीसाठी ही संख्या १७ झाली. शहरात ४ हजार ९९९ मतदार आहेत. या मतदारांना १७ वॉर्डात विभागले जाऊन मतदारयादी तयार होणे अपेक्षित होते. परंतु प्रत्येक वॉर्डात कमी-अधिक मतदार दिसत आहे. त्यामुळेच १३ क्रमांकाचा वॉर्ड केवळ ९१ मतदारांचा झाला आहे तर, सर्वात मोठा ५०१ मतदार असलेला १७ क्रमांकाचा वॉर्ड आहे. या प्रकारामुळे नागरिकांत चांगलीच नाराजी दिसून येत आहे.
नगरपंचायतीच्या वॉर्ड रचनेत प्रचंड घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2015 01:52 IST