ग्रामपंचायतींना २६ लाखांचा महसूल : अमरावती विभागात यवतमाळ जिल्हा ‘टॉप’वरयवतमाळ : प्रशासकीय कामांना गतिमान करण्यासोबत सर्वसामान्यांचा वेळ वाचावा यासाठी ‘संग्राम’ केंद्रांची स्थापना करण्यात आली. ग्रामपंचायतस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या केंद्रामधून ३२ प्रकारचे दाखले दिले जातात. गत वर्षभरात तब्बल तीन लाख १२ हजार ६४९ दाखले देण्याचा विक्रम यवतमाळच्या नावे नोंदविला गेला आहे. अमरावती विभागात सर्वाधिक दाखले जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधून वितरित झाले आहे.जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये संग्राम केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रांवर ३२ प्रकारचे दाखले दिले जात आहे. यामध्ये मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, वीज जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र, ना देय प्रमाणपत्र, शौचालय दाखला, बांधकामासाठी अनुमती प्रमाणपत्र, जन्म नोंदणी प्रमाणपत्र, मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र, नोकरी व व्यवसायासाठी प्रमाणपत्र, हयातीचा दाखला यासह विविध दाखले याठिकाणावरून दिले जातात. पूर्वी हे दाखले मिळविण्यासाठी तहसील गाठावे लागत होते. आता संग्राम केंद्रामध्ये प्रमाणपत्र उपलब्ध होत आहे. यामुळे ग्रामस्थांचा वेळ वाचला आहे. यातून ग्रामपंचायतीच्या महसुलात भर पडली आहे. वर्षभरात २६ लाख ८४ हजार ७७९ रुपयांचा महसूल ग्रामपंचायतीला मिळाला आहे. यातून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही भर पडण्यास मोलाची मदत झाली आहे. शिवाय नागरिकांचा तालुका ठिकाणी जाण्यासाठीचा खर्चही वाचला आहे. (शहर वार्ताहर)संग्राम केंद्रांची भूमिका ग्रामपंचायतीमध्ये महत्त्वपूर्ण आहे. यामुळे कामाला गती मिळाली आहे. येणाऱ्या वर्षात यापेक्षाही चांगली कामगिरी जिल्ह्यात करण्याचा प्रयत्न आहे.- डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी,सीईओ, यवतमाळ
वर्षभरात तीन लाख दाखल्यांचा उच्चांक
By admin | Updated: April 3, 2015 00:52 IST