दारव्हा : वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या तेरवीत अनाठायी खर्च करण्याऐवजी या पैशातून वृद्धाश्रमाला मदत करण्याचा व हा दिवस वृद्धांसोबत घालविण्याचा निर्णय दारव्हाच्या दुधे परिवाराने घेतला आहे. येथील हरिभाऊ लक्ष्मणराव दुधे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे त्यांचे सुपुत्र ग्रामसेवक संघटनेचे नेते संजय दुधे आणि गजानन दुधे यांनी परंपरेला फाटा देत वडिलांच्या तेरवीत अनाठायी खर्च करण्यापेक्षा कायम स्मरणात राहील असा उपक्रम करण्याचा निर्णय घेतला.आर्णी तालुक्यातील उमरी पठार येथील संत दोला महाराज वृद्धाश्रमात कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. यावेळी पालकमंत्री संजय राठोड उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांना वस्त्र वाटप करण्यात येईल तसेच अन्नदानसुद्धा करण्यात येणार आहे. उर्वरित खर्च आर्थिक मदतीच्या स्वरूपात वृद्धाश्रमाला देण्यात येणार आहे. ग्रामसेवक असलेले संजय दुधे यांनी अनेक गावात सेवा देताना त्या ठिकाणी विविध उपक्रम राबविले आहे. त्यांनी कुभारकिन्ही, बोथा या गावात असताना निर्मल ग्राम पुरस्कार मिळवून दिला. त्याबद्दल त्यांचा तत्कालीन राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम आझाद यांचे हस्ते दिल्ली येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला होता. ते ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष असताना त्यांनी संघटनेच्यावतीने मुंगसाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त धामणगाव देव येथे दर्शनाकरिता येणाऱ्या यात्रेकरूकरिता अन्नदान कार्यक्रमाची सुरुवात केली. हा उपक्रम आजही सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)
तेरवीच्या खर्चातून वृद्धाश्रमाला मदत
By admin | Updated: October 7, 2016 02:40 IST