औषधांचा ठणठणाट : महागाव तालुक्यातील गोपालक हैराणमहागाव : जनावरांवर योग्य उपचार व्हावे, यासाठी महागाव तालुक्यात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या पशु उपचार केंद्रात सध्या प्रचंड असुविधा निर्माण झाल्या आहे. औषधांचा कायम ठणठणाट असून डॉक्टरही मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे महागाव तालुक्यातील एक लाख जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महागाव तालुका हा डोंगरदऱ्यात वसलेला आहे. येथील बहुतांश नागरिकांचा गोपालन हा मुख्य व्यवसाय आहे. गावागावात शेकडो जनावरे आहे. या जनावरांची योग्य देखभाल आणि उपचार व्हावे यासाठी महागाव, फुलसावंगी, गुंज, वनोली, काळीदौलत, खडका, मुडाणा, पोहंडूळ, पोखरी, टेंभी आणि वडद अशा ११ ठिकाणी पशु उपचार केंद्र आहे. एकाही उपकेंद्राचे अधिकारी किंवा महागावचे विस्तार अधिकारी मुख्यालयी राहत नाही. वेळेवर उपचार मिळत नसल्याने तालुक्यात अनेक जनावरे तडफडून मरत आहे. सध्या जनावरांना अज्ञात रोगाची लागण झाली आहे. योग्य उपचार होत नसल्याने अनेकांनी आपली जनावरे विक्रीस काढली आहे. गेल्या दोन वर्षात किमान २० हजार जनावरे तालुक्यातून कमी झाली आहे. याचा फटका दूध उत्पादनाला बसत आहे. एकीकडे केंद्र शासन आणि राज्य शासन दुधाळ जनावरांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. परंतु या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. जनावरांवर उपचारासाठी रुग्णालय आहे परंतु त्या ठिकाणी औषधांचा कायम ठणठणाट असतो. महागाव या तालुका मुख्यालयीच पशु वैद्यकीय अधिकारी १५-१५ दिवस येत नाही. तर इतर केंद्रांची काय स्थिती असेल हे न सांगितलेलेच बरे. बहुतांश ठिकाणी कंपाऊंडरच उपचार करताना दिसून येतो. जुजबी उपचार करून शेतकऱ्यांची बोळवण केली जाते. (शहर प्रतिनिधी)लसीकरणाचा अभाव महागाव तालुक्यात जनावरांना अज्ञात आजाराची लागण झाली आहे. परंतु लसीकरणाची बोंबाबोंब आहे. पशुधन विमा, पीपीआर रोग निर्मूलन अभियान, लाळ, खुर रोगप्रतिबंधक, कुकुटपालन आदींबाबत कधीच मेळावे घेतले जात नाही. त्यामुळे तालुक्यातील पशु उपचार केंद्र शोभेच्या वस्तू झाल्या आहेत.दयनीय अवस्थेला जबाबदार कोणमहागाव तालुक्यातील पशु उपचार केंद्राच्या दयनीय अवस्थेला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक पशु वैद्यकीय उपचार केंद्रात कामकाज ढेपाळले आहे. जिल्हा पशुधन विकास अधिकाऱ्यांची निष्क्रीयताही याला कारणीभूत आहे. तालुक्यातील पशु उपचार केंद्र कधी कात टाकणार असा प्रश्न आहे.
पशु चिकित्सालयात प्रचंड असुविधा
By admin | Updated: October 17, 2016 01:49 IST