लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या प्रलंबित प्रश्नाकडे सरकारी यंत्रणेकडून सातत्याने दुर्लक्ष झाल्याने आरोग्य सेवकांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. आरोग्य सेवकांच्या संपाने आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे.
आरोग्य सेवक गत १२ वर्षांपासून काम करीत आहेत. मात्र, त्यांचा पगार केवळ १२ हजार आहे. त्यांना 'समान काम समान वेतन' या धोरणानुसार वेतन मिळावे. 'आरोग्य मित्रा'च्या वेतनात दरवर्षी १० टक्के वेतनवाढ करण्यात यावी. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत आयुष्यमान कार्डचे काम आरोग्य सेवकांनी केले. मात्र, याचा अद्यापही मोबदला मिळाला नाही. कोविड महामारीतील अतिरिक्त कामाचा मोबदला देण्यात यावा. एनआरएचएमच्या धरतीवर एसएसएएसमध्ये आरोग्य मित्रांना कायमस्वरूपी नियुक्त करण्यात यावे, यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलक ठाम आहेत. पूर्वी आचारसंहिता संपल्यावर आपल्या मागण्या पूर्ण होतील, असे सांगितले गेले. त्यानंतर नवीन सरकार स्थापन झाले आहे, असे म्हणत पुन्हा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले. अखेरीस आरोग्य सेवकांनी बेमुदत संपाचा निर्णय घेतला.
यांनी नोंदविला सहभागआरोग्यसेवकांच्या संपात चंदू रावेकर, निखिल राऊत, अपर्णा आसोले, युवराज चव्हाण, गौरव शेंदुरकर, नीलेश ठाकरे, संजय राठोड, मनिष इसाळकर, किरण मोगरकर, पूजा चव्हाण, आकाश वानखडे, धनश्री आसोले.
काळ्या फिती लावून निषेधआरोग्य सेवकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याने मंगळवारी आरोग्यसेवकांनी काळ्या फिती लावून राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. यावेळी मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन कायम राहणार असल्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला. विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.