रुग्णांचे हाल : पुसदमध्ये राहून ग्रामीण भागात ‘रुग्णसेवा’ पुसद : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर नियुक्त वैद्यकीय अधिकारी पुसदमध्ये राहून ग्रामीण भागात ‘रुग्णसेवा’ करीत असल्याचे दिसत आहे. सुसज्ज शासकीय निवासस्थाने असतानाही या अधिकाऱ्यांना मुख्यालयाची अॅलर्जी आहे. परिणामी रुग्णांना उपचारासाठी पुसद गाठावे लागते. पुसद तालुक्यात गौळ बु., फेट्रा, शेंबाळपिंपरी, जांबबाजार, बेलोरा, चोंढी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सध्या ग्रामीण भागात आजाराची साथ पसरली आहे. ० ते १२ वयोगटातील बालक प्रभावित झाले आहे. माळपठारावरील बेलोरा आणि फेट्रा या आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ४० गावात तापाची साथ दिसत आहे. परंतु बेलोरा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाही. ७० किलोमीटर असलेल्या आर्णी येथून अपडाऊन करतात तर फेट्राचे वैद्यकीय अधिकारी पुसद शहरात राहून रुग्णसेवा करीत आहे. यामुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणा प्रभावित झाली आहे. रुग्णांना ३० किलोमीटर अंतर पार करुन पुसद येथे उपचारासाठी यावे लागते. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसतो आणि वेळेवर सेवाही मिळत नाही. (प्रतिनिधी)
वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयाची अॅलर्जी
By admin | Updated: September 5, 2015 02:55 IST