रबी मशागत : केरकचरा काढताना अपघातढाणकी : रबी हंगामासाठी ट्रॅक्टरने मशागत करणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याचा रोटाव्हेटर खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे घडली. रमेश सोनुने (३०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शनिवारी ४ वाजताच्या सुमारास तो आपल्या शेतात ट्रॅक्टरने मशागतीचे काम करीत होता. सोयाबीनच्या रानात रोटाव्हेटर करणे सुरू होते. रोटाव्हेटरमध्ये कचरा अडकल्याने तो काढण्यासाठी रमेश खाली वाकला. मात्र त्याच वेळी रोटाव्हेटर खाली तो आला. अंगावरून रोटाव्हेटर गेल्याने गंभीर जखमी झाला. हा प्रकार त्या परिसरात असलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात आला. जखमी अवस्थेत ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी उपचार सुरू केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने नांदेडला नेण्याचा सल्ला देण्यात आला. नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रमेश हा इतरांची जमीन मक्त्या बटाईने करून तो कुटुंबाचा गाडा ओढत होता. कष्टकरी शेतकरी अशी त्याची परिसरात प्रतिमा होती. या घटनेने ढाणकी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे सध्या शेतांमध्ये रबी हंगामाच्या मशागतीची कामे सुरू असून सर्वत्र ट्रॅक्टरचा आधार घेतला जातो. लहानशी चुकही शेतकऱ्यांच्या जीवावर बेतू शकते. (वार्ताहर)
रोटाव्हेटरमध्ये चिरडून ढाणकीत शेतकरी ठार
By admin | Updated: November 7, 2016 01:03 IST