शिक्षण विभागाचे फर्मान : जेजे रूग्णालयात केली जाणार तपासणीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : समायोजनात बदली टाळण्यासाठी अतिरिक्त शिक्षकांनी मोठ्या संख्येत अपंगत्व प्रमाणपत्रे सादर केली. एकाच शाळेतील तब्बल १६ शिक्षकांनी आपण अपंग असल्याचा आश्चर्यकारक दावा केला. ही बाब ‘लोकमत’ने सोमवारी उजेडात आणताच प्रशासन जागे झाले. ताबडतोब सर्वच अपंग शिक्षकांना तपासणीसाठी बोलावून घेण्यात आले. सोमवारी दिवसभर झालेल्या या झाडाझडतीत ‘संशयास्पद’ ठरलेल्या शिक्षकांना थेट मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात तपासणीला पाठवून कारवाई करण्यात येणार आहे.अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया रविवारी जिल्हा परिषद सभागृहात पार पडली. यावेळी जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांमधील शिक्षकांचे समायोजन वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण झाले. मात्र, यवतमाळ पंचायत समितीमधील बहुतांश अतिरिक्त शिक्षकांनी बदली टाळण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अपंगत्वाची प्रमाणपत्रे मोठ्या प्रमाणात सादर करण्यात आली. विशेष म्हणजे, एकाच शाळेतील तब्बल १६ शिक्षकांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केले, तेव्हा इतर शिक्षकांच्या संयमाचा बांध फुटला. कर्णबधीर असल्याचा दावा करत अनेक शिक्षक गेल्या २० वर्षांपासून यवतमाळ शहराच्या आसपास कार्यरत आहेत. मात्र यावेळी त्यांच्याच शाळेतील वंचित शिक्षकांनी तक्रारी केल्या आणि यवतमाळची समायोजन प्रक्रिया थांबविण्यात आली. हे वृत्त ‘लोकमत’ने उजेडात आणताच प्रशासनाने सोमवारी सर्वच अपंग गुरूजींना ताबडतोब तपासणीसाठी बोलावून घेतले.सोमवारी दिवसभर जिल्हा परिषदेत अपंग शिक्षकांच्या मूळ प्रमाणपत्रांची विस्तार अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली. त्यातील जी प्रमाणपत्रे संशयास्पद आहेत, अशा शिक्षकांना थेट मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात अपंगत्व तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. बोगस अपंत्वाच्या आडून बदलीत सवलत मिळविल्याचे सिद्ध झाल्यास अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग आणि वेळप्रसंगी फौजदारी कारवाईच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. परंतु, सोमवारच्या तपासणीत नेमकी किती प्रमाणपत्रे संशयास्पद ठरली, ही बाब प्रशासनाने तूर्त गुलदस्त्यात ठेवली आहे. आता मंगळवारी १६ मे रोजी यवतमाळ पंचायत समितीमधील शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया होणार असून त्यात खऱ्या अपंगांना लाभ मिळतो की सरसकट सर्वच अपंगांना सूट मिळते, याबाबत उत्सुकता आहे.केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्यादरम्यान, सोमवारी केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडली. यात १५ मे २०१४ च्या जीआरनुसार १३ प्रशासकीय तर ६ विनंती अशा १९ केंद्रप्रमुखांच्या बदल्या करण्यात आल्या. परंतु, अनेक केंद्रप्रमुखांनी बदलीस नकारही दिल्याचे समोर आले. तसेच ५ विस्तार अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय तर ५ विनंती अशा १० विस्तार अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या.
अपंग गुरुजींनो, हजर व्हा!
By admin | Updated: May 16, 2017 01:25 IST