तहसीलदारांची सहृदयता : नऊ कुटुंबांना मानसिक आधारराळेगाव : सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांमध्ये मात्र अंधार दाटला आहे. मात्र तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्या पुढाकाराने तब्बल नऊ गरीब कुटुंबीयांकडे दिवाळीच्या आदल्या दिवशीच प्रशासनातर्फे संपूर्ण किराणा व इतर साहित्य पोहोचविण्यात आले. कोणतीही पूर्वसूचना न देता आलेली ही मदत आत्महत्याग्रस्तांना मोठा मानसिक आधार ठरली.तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दिवाळीची काळजी घेतली आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना आधार देण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन गरिबांच्या प्रत्यक्ष घरी जावून किराणा, त्यांच्या मुलाबाळांसाठी नवीन कपडे, मिठाई आदी साहित्य पोहोचते केले. शिवाय या घरातील दु:खी लोकांना आवर्जून सांगितले, कोणतीही मदत लागल्यास न चुकता आमच्याकडे निरोप पाठवा. तहसीलदारांच्या या उपक्रमात उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, नायब तहसीलदार मधुकर गेडाम, राजाराम मडावी, मंडळ अधिकारी अरविंद गोटे, गिरीष खडसे, विनोद वाढोणकर, रामकृष्ण कापसे, मोहन सरतापे, विनोद अक्कलवार, शरद सावरबांधे, चेतन कोडापे आदी सहभागी झाले होते. या सर्वांनी आपल्या कामातून आत्महत्याग्रस्तांच्या भेटीसाठी एक दिवस वेगळा काढला. आर्थिक मदतीपेक्षाही ऐन दिवाळीत या अधिकाऱ्यांनी दिलेली भेट आत्महत्याग्रस्तांना दिलासा देऊन गेली. तालुक्यातील झाडगाव येथील मोरेश्वर रेंघे यांनी कर्जापायी आत्महत्या केली. त्यांच्या पत्नीला साडी, एक वर्षाच्या सोहम नावाच्या मुलाला नवीन कपडे, दिवाळीचा किराणा या अधिकाऱ्यांनी पोहोचवून दिला. नीलिमा रेंघे या महिलेला या अधिकाऱ्यांना कुठे बसवावे, हा प्रश्न पडला होता. मात्र अधिकाऱ्यांनीच या महिलेला सांगितले की, धावपळ करू नका. सोहमला नवीन कपडे घालून द्या. आनंदाने दिवाळी करा. आम्ही सर्व तुमच्या सोबतीला आहो. हे वाक्य ऐकून नीलिमाने डोळे पुसले. वरणा येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबात आता केवळ आईच शिल्लक आहे. नानीबाई अनंतराव राऊत यांच्या चंद्रमौळी झोपडीतही किराणा पोहोचविण्यात आला. कपडे आणि मिठाईसुद्धा पाहून नानीबाईचा ऊर दाटून आला. वडगाव येथील राहूल केमेकर या शेतकऱ्याच्या गैरहजेरीत त्याचे कुटुंब पोरके झाले. महसूल विभागाचा ताफा त्यांच्याही घरी पोहोचला. त्यांच्या नऊ महिन्यांच्या पोेर्णिमा हिच्या नावाने ११ हजार रुपयांचा फिक्स डिपॉझिटचा चेक पोहोचविला. तिची आई ज्योती आनंदून गेली. आंजी येथील किसन सोयाम या शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्याची आईदेखील दगावली. मोठा भाऊसुद्धा आजारात गेला. फक्त अमोल सोयाम व लहान बहीण दोघेच शिल्लक आहे. याही घरात मदत पोहोचविण्यात आली. उमरविहीर येथील आत्महत्याग्रस्त पवार कुटुंबात फक्त १२ वर्षांची जयश्री पवार आपल्या आजीसह राहात आहे. याही घरी राळेगाव येथील तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी किराणा व अन्य मदत पोहोचविली. वेडसी येथील संतोष मस्कर या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी विद्या आपल्या तीन मुलींसह गरिबीशी झगडत आहे. त्याचबरोबर वाढोणाबाजार येथील छाया बंडूजी डहाळकर, उमरेड येथील रेखा अरुण कचवे, सखी कृष्णापूर येथील सुनंदा नागोराव कोटेकार या आत्महत्याग्रस्तांच्या घरातही महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिवाळीचा किराणा व अन्य साहित्य पोहोचवून दिले. तालुक्यातील अशा नऊ घरांना तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्या सहृदयतेने दिलासा मिळाला. या उपक्रमाने नागरिकांचे लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)तालुक्यातील अनेक शेतकरी कुटुंबातून कर्तबगार पुरुष निघून गेल्याने हे कुटुंब दु:खात आहे. सणासुदीला त्यांनाही आनंद मिळावा म्हणून तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्या उपक्रमाला आम्हीही हातभार लावला.- जनार्दन विधातेउपविभागीय अधिकारी, राळेगाव
आत्महत्याग्रस्तांच्या घरी पोहोचविला किराणा
By admin | Updated: November 11, 2015 01:43 IST