वणी : यावर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यात सोयाबिनच्या बियाण्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या बियाण्यांचा काळाबाजार होण्याची शक्यता वाढली आहे. कृषी विभागाने मात्र शेतकर्यांना घरचे बियाणे वापरण्याचा सल्ला दिला आहे.रोहिणी नक्षत्र सुरू होताच शेतकर्यांनी बियाण्यांसाठी धावपळ सुरू केली आहे. येत्या ८ जूनपासून मृगाला सुरूवात होत असल्याने बळीराजा पेरणीसाठी लगबग करीत आहे. पावसाची चाहूल लागल्याने आता शेतकरी बांधव बियाणे खरेदी करण्याकडे वळले आहे. मात्र बाजारात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. तालुक्यात जवळपास चार हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा आहे.वणी तालुक्यात ९२ हजार ३१८ हेक्टर एकूण क्षेत्र आहे. त्यापैकी ६४ हजार ४२५ हेक्टर क्षेत्र खरीपाच्या लागवडीयोग्य आहे. त्यापैकी यावर्षी केवळ १0 हजार ७९८ हेक्टर क्षेत्रात सोयाबिन पेरणीचे नियोजन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. मागीलवर्षी हेच क्षेत्र ११ हजार ९९७ हेक्टर होते. त्यात यावर्षी घट होणार आहे. त्यासाठी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा कारणीभूत ठरत आहे. सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा असल्याचे कृषी विभागानेही कबूल केले आहे. त्यामुळे त्यांनी शेतकर्यांना घरचे बियाणे वापरण्याचा सल्ला दिला आहे. एकट्या वणी तालुक्याला खरीपात आठ हजार १00 क्विंटल सोयाबिनचे बियाणे लागण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात यापैकी केवळ चार हजार १00 क्विंटल बियाणेच उपलब्ध झाले आहे. अर्थात अद्याप सोयाबिनच्या चार हजार क्विंटल बियाण्यांचा तुटवडा आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी कृषी विभागाने शेतकर्यांना आपल्या घरचे सोयाबीन वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी शेतकर्यांना कृषी विभाग मदतही करणार आहे. शेतकर्यांकडील सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता ते गावातच तपासून देणार आहे. सोयाबिनची उगवण क्षमता तपासून देण्यासाठी कृषी विभागाचे पथक गावात जाणार आहे. यातून काही प्रमाणात बियाणे टंचाई कमी होण्याची अपेक्षा कृषी विभागाला आहे. सोबतच वणीतील वेअर हाऊसधून ९५0 क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत हालचाल सुरू आहे. वेअर हाऊस आणि शेतकर्यांकडील बियाणे मिळूनही उर्वरित चार हजार क्विंटल बियाण्यांचा तुटवडा भरून निघणे अशक्य आहे. त्यामुळे तालुक्यात किमान दोन हजार ५00 क्विंटल बियाण्यांचा तुटवडा राहणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
वणी तालुक्यात सोयाबीन बियाण्यांचा प्रचंड तुटवडा
By admin | Updated: May 31, 2014 00:13 IST