पुसद : तालुक्यातील हुडी बु. येथील ग्रामसेवकाने केलेला अपहार चौकशीत सिद्ध झाल्यानंतरही सदर ग्रामसेवकावर अद्याप फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या ग्रामसेवकावर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा हुडीचे सरपंच संतोष धरणे यांनी गटविकास अधिकाऱ्याला दिलेल्या निवेदनातून दिला आहे. पुसद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या हुडी येथील ग्रामसेवक ए.डी. शिखरे यांनी कार्यरत असताना गृहकराची वसुली केली. त्यात सात हजार ४४९ रुपये परस्पर खर्च केले. २३ हजार पाच रुपयांपैकी उर्वरित रक्कम १५ हजार ५४६ रुपये बँकेत जमा न करता आणि सरपंचांना विश्वासात न घेता परस्पर खर्च केले. पाणी पुरवठा अंतर्गत पाणी पट्टीची वसुली करण्यात आली. यामध्ये चार हजार २६ रुपये परस्पर खर्च करण्यात आला आहे. ही बाब नियमबाह्य आहे. सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता गावकऱ्यांचाही या प्रकरणात विश्वासघात झाल्याने सर्वसामान्य गावकऱ्यांमध्येही कमालीचा रोष व्यक्त होत आहे. नियमांना धाब्यावर बसवून केवळ स्वत:चा स्वार्थ यातून साध्य केल्याचे दिसत असल्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार संबंधितावर गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. तसेच पाणी पुरवठ्याच्या निधीतही अपहार केल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे. परंतु अद्यापही ग्रामसेवकावर गुन्हा दाखल झाला नाही. या प्रकरणी योग्य कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा सरपंचांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
अपहार करणारा ग्रामसेवक मोकळाच
By admin | Updated: September 28, 2015 02:48 IST