यवतमाळ : ग्रामपंचायतींनी पाणी व्यवस्थापन व पाणी गुणवत्तेवर विशेष लक्ष दिले पाहिजे. पाण्याची पातळी वाढविण्यासाठी, पाण्याचा प्रत्येक थेंब साचविण्यासाठी नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिीनाथ कलशेट्टी यांनी केले. ते पाणी व्यवस्थापन कार्यशाळेला मार्गदर्शन करीत होते.पाणी मनुष्याचे जीवन आहे. पाण्याशिवाय मानवी जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे. पावसाळा आला की पाणी प्रदूषणाला सुरुवात होते. दूषित पाणी पिल्यामुळे साथ रोगाचा उद्रेक होतो. जिल्ह्यातील साथ रोगांना नियंत्रित करण्यासाठी पावसाळापूर्व नियोजन म्हणून पाणी व्यवस्थापन कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य व शिक्षण सभापती मनमोहनसिंग चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के. झेड. राठोड, शल्य चिकित्सक डॉ.सोनोने व कार्यकारी अभियंता किरण मानकर उपस्थित होते. ग्रामपंचायत, तालुका व जिल्हास्तर यांनी कामाचे योग्य नियोजन करून काम केल्यास साथ रोगांवर नियंत्रण मिळविता येईल. साथ रोग नियंत्रणात कार्यतत्परतेने काम करावे, असे आवाहन प्रवीण देशमुख यांनी केले. या वेळी शाखा अभियंता अनिल त्रिवेदी, प्रांजली नंदूरकर, सचिन मातळे, डॉ. रणमले, अरुण मोहोड, पुंजाजी देशमुख आदींनीसुद्धा मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला सर्व तालुका आरोग्य अधिकारी, उपअभियंता, शाखा अभियंता, वेगवेगळ्या विभागांचे विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, तालुका स्तरावरील गटसमन्वयक व समूह समन्वयक, तालुका प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
ग्रामपंचायतींनी पाणी व्यवस्थापनावर लक्ष द्यावे
By admin | Updated: June 19, 2014 00:19 IST