यवतमाळ : शहरात शालेय पोषण आहार अफरातफर प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्ह्यातील शाळांमध्ये असलेल्या धान्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे. दोषी कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार आहे. येथील पांढरकवडा मार्गावर पोषण आहाराच्या तांदूळाचे रिफिलिंग करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. शाळांमध्ये कमी वजनाचे पोते पोहोचविले जात होते. आतापर्यंत शाळांना किती किलो धान्य पाठविले, सध्या किती शिल्लक आहे, त्याचे वजन काय, शाळांच्या स्टॉक रजिस्टरची नोंदणी आदी बाबींची तपासणी केली जाणार आहे. यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले असून उपशिक्षणाधिकारी वाल्मिक इंगोले यांच्या नेतृत्वातील पथक शाळांची तपासणी करणार आहे. यामध्ये कमी वजनाचे पोते मुख्याध्यापकाने स्वीकारल्याचे लक्षात आल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले आहे. यातून धान्याचा महाघोटाळा पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (शहर वार्ताहर)
शाळांमधील धान्याची चौकशी
By admin | Updated: March 22, 2015 23:59 IST