विवेक पांढरेलोकमत न्यूज नेटवर्कफुलसावंगी : येथील शेख इस्माईल शेख इब्राहिम ऊर्फ मुन्ना हेलिकॉप्टर याने सिंगल सीटर हेलिकॉप्टर बनविण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले. त्याच हेलिकॉप्टरचे प्रात्यक्षिक करताना त्याच्यावर काळाने घाला घातला. त्याने टाकाऊ वस्तूंपासून टिकावू हेलिकॉप्टर बनविण्याचे धेय उराशी बाळगून घराच्या टिनांवरच हुबेहूब प्रतिकृती साकारली होती.मुन्नाने सुटे भाग व साहित्य डिस्पोजल (टाकाऊ किंवा भंगार) वस्तूंच्या दुकानातून खरेदी करून काम सुरू केले. मुख्य पात्याला लागणारी ॲल्युमिनियमची सीट हैदराबाद येथून आणली होती. मारोती ८००चे इंजिन डिस्पोजलमधून आणून वापरले. आपल्या कलेची काॅपी करू नये म्हणून तो नातेवाइकांच्या दुकानात मुख्य पाते तयार करीत होता. मुख्य दोन पाते बनवण्यासाठी जवळपास एक महिना लागला. मेन रोटरला झेड सिस्टीम बनवायचे सर्व साहित्य हैदराबाद येथील बालनगरमधून आणले होते. मेन रोटर आणि टेल रोटर बनवायलाही एक महिना लागला होता.केबिनला समोर लावली जाणारी फायबर ग्लास नांदेड येथून आणली. पात्याचा वेग मोजण्यासाठी आरपीएम मीटर हैदराबादवरून आणले होते. रोटरला फिरविण्यासाठी हाउजिंग मारोती व्हॅनचे वापरले होते. केवळ टेल रोटरचा गिअर बाॅक्स कसा असतो, हे बघण्यासाठी तो हैदराबाद येथे गेला होता. तेथून आल्यानंतर त्याने हुबेहूब तसाच गिअर बाॅक्स बनवला. या टाकाऊ वस्तूंच्या खरेदीसाठी त्याला जवळपास दीड ते दोन लाखांचा खर्च आला होता. दिवसाचे तीन तास मुन्ना हेलिकॉप्टर बनविण्याचे काम करीत होता. गेल्या तीन वर्षांत त्याने या प्रोजेक्टवर जवळपास १५५० ते १६०० तास काम केले, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली. मात्र, मुन्नाचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच काळाने त्याला हिरावून नेले. ही हुरहूर सर्वांच्या मनात कायमची कोरली गेली. दरम्यान, महागाव पोलिसांनी गुरुवारी दुर्घटनाग्रस्त हेलिकाॅप्टर ताब्यात घेतले. मुन्नाच्या घरून काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे ठाणेदार विलास चव्हाण यांनी सांगितले.
शाळेच्या विज्ञान प्रदर्शनात चमक- शेख इस्माईल शेख इब्राहिम ऊर्फ मुन्ना हेलिकॉप्टर याने शालेय जीवनात २००५ मध्ये पीठ गिरणी बनविली होती. शाळेत असताना विज्ञान प्रदर्शनात त्याने थ्री-ईन वन कुलर बनविला होता. ज्यात केवळ सात मिनिटात पिण्याचे पाणी थंड होऊन कुलर थंड हवा देत होता. भाजीपालाही थंड ठेवत होता. तत्पूर्वी त्याने सेलवर चालणारी बोअरिंग मशीन बनविली होती, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.
प्लास्टिकच्या हेलिकॉप्टरला बघून तयारीमुन्नाने राहत्या घराच्या भिंतीवर दोन वर्षांपूर्वीच हेलिकॉप्टरची हुबेहूब प्रतिकृती (डिजाइन) काढली होती. त्यात ठिकठिकाणी वेगवेगळे मोजमाप टाकलेले दिसत आहे. त्याच्या दुकानात एक प्लास्टिकचे हेलिकॉप्टर ठेवलेले आहे. मुन्नाला काही अडचण आल्यास ते हेलिकॉप्टर बघून तो आपल्या कामात सुधारणा करीत होता.