‘जेडी’ स्कूल उपविजयी : मॅन आॅफ द सिरीज शिवम शर्मा, मॅन आॅफ द मॅच चैतन्य सुकळीकर, विवेकानंद विद्यालयाला तिसरे स्थाननीलेश भगत यवतमाळबारा षटकात ७६ धावांचे आव्हान असताना पहिल्या पाच षटकात एक बाद ३८ अशी आक्रमक सुरुवात करणाऱ्या जवाहरलाल दर्डा इंग्लिश स्कूलचा (जेडी) विजय जवळपास निश्चित होता. अचानक सामना पलटला. चैतन्यने धडाकेबाज बॅटिंग करणाऱ्या शिवम शर्मा (२०) ला बाद केले. त्यानंतर एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरू न शकल्याने निर्धारित षटकात संघ सात बाद ६३ धावाच काढू शकला. रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात गत स्पर्धेतील उपविजेत्या जायन्टस् इंग्लिश मीडियम स्कूलने यवतमाळ क्रिकेट प्रीमिअर लीग- २०१५ ची चॅम्पियनशीप पटकाविली. स्थानिक क्रिकेट मास्टर स्वानंद शिंगोटे याच्या स्मरणार्थ बालाजी क्रीडा प्रबोधिनीच्यावतीने यवतमाळ क्रिकेट प्रीमिअर लीगचे आयोजन केले होते. येथील समता मैदान व नेहरू स्टेडियमवर या स्पर्धा रंगल्या. यात यवतमाळसह वणी, महागाव, राळेगाव, घाटंजीतील १६ शालेय संघांनी सहभाग घेतला होता. सोमवारी जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलविरुद्ध जायन्टस् इंग्लिश स्कूल संघात अंतिम सामना झाला. नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करणाऱ्या जायन्टस् संघाने १२ षटकात तीन बाद ७५ अशी धावसंख्या उभारली. चैतन्य सुकळीकरने सर्वाधिक २७ धावा केल्या. ७६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ‘जेडी’ संघाच्या शिवम शर्मा (२०), सागर केशरवानी (१२) यांनी संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. एक बाद ३८ अशी धावसंख्या असताना शिवम बाद झाला. त्यानंतर आलेल्या फलंदाजांना एक-एका धावांसाठी संघर्ष करावा लागला. इकडे जायन्टस्च्या चैतन्य, स्वस्तिक व सागर या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करीत जेडी संघाचे फलंदाज पटापट बाद केले. त्यामुळे जेडी संघाला निर्धारित १२ षटकात सात बाद ६३ धावा काढता आल्याने त्यांना १२ धावांनी पराभव पत्कारावा लागला. अंतिम सामन्यानंतर विजेत्या जायन्टस् इंग्लिश मीडियम स्कूल संघाला २२ हजार २२२ रुपये रोख व आकर्षक चषक, तर उपविजेत्या जेडी संघाला ११ हजार १११ रुपये व चषक देण्यात आला. तृतीय पुरस्कार विवेकानंद विद्यालय संघाला देण्यात आला. आमदार मदन येरावार, लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. यावेळी सीए प्रकाश चोपडा, नगरसेवक अमोल देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, उल्हास नंदूरकर, आनंद उगलमुगले, प्राचार्य मिनी थॉमस, सुजला केशरवानी, नरेंद्रसिंग चव्हाण आदी उपस्थित होते.स्पर्धेत सर्वाधिक १७५ धावा काढणाऱ्या जेडी संघाच्या शिवम शर्माला मॅन आॅफ द सिरीज व बेस्ट बॅस्टमन, मॅन आॅफ द मॅच जायन्टस् संघाचा चैतन्य सुकळीकर, बेस्ट बॉलर गजेंद्र लोंदे व चैतन्य सुकळीकर, बेस्ट सिक्सर जायन्टस् संघाचा भावेश पंचे यांना पुरस्कृत करण्यात आले. याच कार्यक्रमात स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू म्हणून वेदांत दिघडे, क्रिकेट खेळातील योगदानाबद्दल श्रृती महाजन, कुमार चौधरी, उत्कृष्ट समालोचक म्हणून एम.एन. मीर, सचिन भेंडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी किशोर दर्डा म्हणाले, क्रिकेटसाठी स्वतंत्र क्रीडांगणाची आवश्यकता आहे. यासाठी १० एकर जागा मिळाल्यास व्हीसीएकडून दोन कोटी रुपयांचा निधी मिळू शकतो. लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न करावे. ‘वायसीपीएल’ स्पर्धा सातत्याने सुरू राहाव्या, असे त्यांनी सांगितले.आमदार येरावार यांनी पुढील वर्षी यवतमाळ क्रिकेट प्रीमिअर लीग रात्रकालिन स्पर्धेचे भव्य स्वरूपात आयोजन करण्याचे आश्वासन दिले.या कार्यक्रमाचे संचालन प्रा. अनंत पांडे तर आभार जितेंद्र सातपुते यांनी मानले. स्पर्धा आयोजनासाठी बालाजी क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष विनोद दिघडे, सचिव राजेंद्र भुरे, स्पर्धा संयोजक किरण फुलझेले, समन्वयक अभिजित पवार, जय मिरकुटे आदींनी परिश्रम घेतले. (क्रीडा प्रतिनिधी)
जायन्टस् इंग्लिश मीडियम स्कूल चॅम्पियन
By admin | Updated: December 2, 2015 02:44 IST