मानवी कवटीची केलेली पूजा गावकऱ्यांनी केली उद्ध्वस्त गजानन अक्कलवार - कळंबमानवी कवटी, लिंबू, हिरव्या बांगड्या, गुलाल, अगरबत्ती आदींच्या सहाय्याने पूजा मांडून गावकऱ्यात दहशत निर्माण करण्याचा अनाहूताचा प्रयत्न कळंब तालुक्यातील मावळणीच्या विवेकी नागरिकांनीच उधळून लावला. हा प्रकार आढळल्यानंतर निर्माण झालेली दहशत कथित पूजा साहित्य जाळून गावकऱ्यांनीच मूठमाती दिली. मावळणी कळंब तालुक्यातील आडवळणावरील गाव. सोमवारी नेहमी प्रमाणे दिवस सुरू झाला. कुणी तरी सांगत आला बाभळीच्या झाडाखाली पूजा मांडली आहे. गावकऱ्यांनी तिकडे धाव घेतली. पाहतात तो काय मानवी कवटी, गुलाल, हिरव्या बांगड्या, कुंकू, अगरबत्ती आदी साहित्य मांडलेले दिसून आले. सुरुवातीला गावकऱ्यांची पाचावर धारण बसली. अनेक जण तर भीतीपोटी या ठिकाणाकडेही फिरकले नाही. हा काय प्रकार असावा ? कुणी केला असावा असा तर्कविर्तक लावला जाऊ लागला. महिला मंडळी तर चांगलीच हादरुन गेली. असा प्रकार गावात कधीच झाला नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीती निर्माण होऊ लागली. परंतु अशिक्षित आणि आदिवासी बहूल या गावातील नागरिकांनी सुशिक्षितांनाही लाजवेल असे काम केले. काही वेळ निर्माण झालेली भीती बाजूला सारुन पूजा साहित्य हटविण्याचा निर्णय झाला. गावातील काही सुज्ञ नागरिकांनी त्यासाठी पुढाकार घेतला. पूजा साहित्य उचलून मानवी कवटीसह बाजूलाच पेटवून देत खऱ्या अर्थाने अंधश्रद्धेला मूठमाती दिली. मात्र या पूजेच्या प्रकाराने अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे. मानवी कवटी नेमकी आली कोठून, ती कोणाची आहे, यात कोणाचा सहभाग आहे, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. पोलिसांना माहिती देऊनही दुपारपर्यंत पोलीस पोहोचले नव्हते. मात्र जुगार खेळण्यासाठी हा प्रकार केल्याचीही चर्चा आहे. ज्या ठिकाणी पूजा साहित्य मांडले होते. त्या ठिकाणी नेहमी जुगार भरतो. जुगाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी तर हा प्रकार केला नसावा ना असेही बोलले जात आहे. हा प्रकार दहशत पसरविणारा असून त्याची सखोल चौकशी करावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी या गावची रहिवासी तरुणी मनीषा काटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मावळणीत अंधश्रद्धेला मूठमाती
By admin | Updated: January 5, 2015 23:10 IST