उमरखेडच्या तडीपार गुंडाची दहशत : तरुणीला धमक्या, कुटुंबीयांना मारहाणयवतमाळ : तू माझीच बायको आहे, असे तरुणीला धमकावत एका गुंडाने गेल्या दीड वर्षापासून तरुणीचे जगणे मुश्कील केले आहे. तिच्या नावाचे बनावट कागदपत्र तयार करून आपल्यासोबत राहण्यासाठी तो धमक्याही देत आहे. एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या या तरुणाविरुद्ध कारवाई करण्यास पोलीसही कचरत असल्याने अखेर पीडित तरुणीने पत्रकार परिषद घेऊन न्यायाची मागणी केली आहे.उमरखेड येथील पीडित तरुणीने शनिवारी यवतमाळात येऊन पत्रकार परिषद घेतली. त्यात तिने सांगितले की, शाहादत खान रा. रोहीलीपुरा उमरखेड हा विवाहित गुंड तिला गेल्या गेल्या दीड वर्षांपासून लग्नासाठी धमकावत आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असून तडीपार घोषित आहे. त्याला पत्नी व १६ वर्षांचा मुलगा असूनही तो पीडित तरुणीही आपलीच पत्नी असल्याचे सर्वांना सांगत आहे. या तरुणीने २०१४ मध्ये कर्जासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या यवतमाळातील कार्यालयात अर्ज केला होता. तेथूनच शाहादतने पीडितेची कागदपत्रे हस्तगत करून तिच्या नावाचे बनावट दस्तावेज तयार करवून घेतले. त्याने या तरुणीच्या नावाचे मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, रेशनकार्ड असे विविध दस्तावेज तयार केले आहेत. याकामात त्याला उमरखेड तहसील कार्यालयातील महेंद्र पाईकराव, अन्न पुरवठा विभागातील सुभाष पाईकराव, सुनील राठोड या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्याचा आरोपही पीडित तरुणीने पत्रकार परिषदेत केला. बनावट कागदपत्रांद्वारे शाहादतने विदर्भ कोकण बँकेत तिच्या नावाने खातेही उघडले आहे. ती माझी पत्नी आहे, तिला माझ्या घरी पाठवून द्या, अशा धमक्या तिच्या कुटुंबीयांना देणे सुरू केले. याबाबत उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र योग्य ती कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. पोलीस महानिरीक्षकांची भेट घेऊन तरुणीने आपली व्यथा मांडली. तेव्हा त्यांनी उमरखेडचे ठाणेदार शिवाजी बचाटे यांना फोन करून कारवाईचे निर्देश दिले. पण अजूनही संबंधित गुंडाकडून तरुणीला व तिच्या कुटुंबीयांना धमक्या सुरूच आहेत. शिवाय तिच्या नावाने तयार करण्यात आलेल्या बनावट कागदपत्रांची चौकशीही झालेली नाही.अखेर या तरुणीने शनिवारी यवतमाळ गाठून शिवसेना महिला आघाडी प्रमुख लता चंदेल यांना आपली व्यथा सांगितली. त्यानंतर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले. एक महिला असूनही आपल्या तक्रारीची दखल का घेतली जात नाही, पोलिसांनी शाहादतला अटक करावी, त्याने तयार केलेल्या बनावट कागदपत्रांची चौकशी करावी, ही कागदपत्रे तयार करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी या पीडित तरुणीने केली. यावेळी पीडितेसह तिचे वडील, लता चंदेल उपस्थित होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)
जबरदस्तीच्या लग्नासाठी बनावट कागदपत्रे
By admin | Updated: February 14, 2016 02:21 IST