सोन्याचे दागिने लंपास : लग्न घरी चोरट्यांनी केला हात साफ लोकमत न्यूज नेटवर्क दिग्रस : घरच्या लग्न समारंभानंतर आयोजित स्वागत सोहळ््यासाठी सर्व मंडळी कार्यक्रमस्थळी असल्याची संधी साधून चोरट्याने एका घरातून तब्बल चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना दिग्रस येथील तेलंगीपुऱ्यात घडली. या चोरीने एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिग्रस येथील तेलंगीपुरातील महंमद सलिम अब्दुल रहीम यांच्या मुलाचे लग्न ९ मे रोजी पार पडले. दुसऱ्या दिवशी स्वागत सोहळा येथील अंजुमन शाळेत आयोजित करण्यात आला होता. सर्व कुटुंब घराला कुलूप लावून कार्यक्रमस्थळी गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्याने घराच्या मागचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. अलमारीतील सोन्या-चांदीचे दागिने, चावल पोत १० ग्रॅम, सेवन पीस १२ ग्रॅम, सोन्याचा हार २६ ग्रॅम, मंगळसूत्र १३ ग्रॅम, झुमके १० ग्रॅम, सोन्याच्या चार अंगठ्या २० ग्रॅम, कंगण चार नग १० ग्रॅम, टॉप्स ५ ग्रॅम, चांदीच्या तोरड्या २० ग्रॅम, चांदीचे पैंजन १८ तोळे, चांदीचे पायपट्टे १० तोळे व रोख आठ हजार असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान, कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांचा मुलगा वसीम रात्री ११ वाजता घरी आला, तेव्हा त्याला चोरी झाल्याचे लक्षात आले. या चोरीची तक्रार शुक्रवारी दुपारी दिग्रस पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे करीत आहेत.
दिग्रस येथे चार लाखांची धाडसी चोरी
By admin | Updated: May 12, 2017 00:18 IST