ढाणकी : शासकीय जागेवर अतिक्रमण करून दुकान गाळ्यांचे बांधकाम केल्याप्रकरणी उमरखेड तालुक्यातील ढाणकी ग्रामपंचायतीला महसूल प्रशासनाने तब्बल चार कोटी आठ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ८० गाळेधारकांनाही नोटीस बजावली असून तीन दिवसात गाळे खाली करण्याचे यात म्हटले आहे. त्यामुळे ढाणकी येथील व्यापारी चांगलेच हादरले आहे. ढाणकी येथील जुन्या बसस्थानकाजवळ दुकान गाळे बांधलेले आहे. २००४ पूर्वी त्या जागेवर अतिक्रमण होते. ते अतिक्रमण हटवून ग्रामपंचायतीने दुमजली ८० दुकान गाळे बांधले. त्यात त्या ठिकाणी पूर्वी व्यापार करीत असलेल्यांना प्राधान्यांना देण्यात आले. यासाठी व्यापाऱ्यांकडूनच पैसाही गोळा करण्यात आला. २००५ मध्ये ११ वर्षांसाठी हे दुकाने व्यापाऱ्यांना भाड्याने देण्यात आली. सर्व व्यापाऱ्यांकडून करापोटी निर्धारित रक्कम ग्रामपंचायतीला मिळत होती. आता ११ वर्षांचा करार संपत आल्याने गाळेधारकांना पुढचा करार करण्यासाठी ग्रामपंचायतीने सुचविले. त्यानुसार बैठकाही झाल्या. परंतु भाड्याबाबत सहमती झाली नाही. रेडीरेकनरनुसार भाडे मिळावे हा ग्रामपंचायतीचा आग्रह होता. तर व्यापारी भाडे जास्त होत असल्याचे म्हणत आहे. भाड्याचा तिढा सोडविण्याचा प्रयत्न सुरू असताना उमरखेड तहसील प्रशासनाकडून ग्रामपंचायतीला नोटीस बजावण्यात आली. त्यात चार कोटी रुपये दंड आणि गाळेधारकांना दुकाने खाली करण्याचे लिहिले असल्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले. या काय कारवाई होते, याकडे ढाणकी येथील व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
ढाणकी ग्रामपंचायतीला चार कोटींचा दंड
By admin | Updated: February 15, 2016 02:32 IST