यवतमाळ नगरपरिषद : पीएफचा प्रश्न प्रलंबितयवतमाळ : भविष्य निर्वाह निधीत झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात यवतमाळ नगरपरिषदेतील अस्थायी कामगारांनी बेमुदत कामबंदचा इशारा दिला आहे. संत गाडगेबाबा नगरपरिषद अस्थायी कामगार विकास संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन छेडले जाणार आहे. या संदर्भात झालेल्या बैठकीत सदर विषयावर चर्चा करण्यात आली. २००२ ते २०११ पर्यंत सर्व १७५ कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचा भरणा करून त्यांच्या नावे प्रत्येकी वार्षिक पावती प्रत मिळावी, सन २०११ ते २०१४ या वर्षातील बेरोजगारांची क्षितिज नागरी सहकारी संस्था अमरावती यांच्याकडील काम करत असलेल्या सर्व २३६ कामगारांच्या नावे आणि आठ तास काम करत असलेल्या ४० कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचा भरणा करावा आदी प्रश्न या सभेमध्ये चर्चिले गेले. सर्व कामगारांना प्रतिदिन किमान ३०० रुपये मजुरी मिळावी, साप्ताहिक पगारी सुटी देण्यात यावी, शासनातील कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या सुविधा मिळाव्या आदी प्रश्न घेऊन आंदोलनाचा निर्णय या सभेत घेण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद शेंडे, सचिव विनोद डोंगरे, सहसचिव सुरेश भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते, असे जिल्हा संघटक अंकुश मेश्राम यांनी कळविले आहे. (वार्ताहर)
अस्थायी कामगार आंदोलन करणार
By admin | Updated: November 22, 2014 23:09 IST