पुसद : तालुक्यातील सावंगी येथे मटणाची भाजी लवकर का केली नाही, या कारणावरून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलेल्या पतीला न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आज ठोठावली. आरोपी दिगांबर माणिक वाघमारे (४०) याने त्याची पत्नी वर्षा हिला २७ मे २०१४ रोजी मटणाच्या भाजीच्या क्षुल्लक कारणावरून पेटवून दिले. ९६ टक्के जळालेल्या अवस्थेत ती यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात मरण पावली. तिच्या मृत्यूपूर्व बयाणावरून गुन्हा दाखल करून प्रकरण न्याय प्रविष्ट करण्यात आले होते. या प्रकरणी तत्कालीन ठाणेदार भगवान वडतकर यांनी तपास करून न्यायालयात पुरावे सादर केले होते. या प्रकरणी न्यायालयाने सहा साक्षीदार तपासले. मृत्यूपूर्व बयान आणि परिस्थितीजन्य पुराव्यावरून आरोपी दिगांबरनेच पत्नीचा खून केल्याचे सिद्ध झाले. दिगांबरला पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे. शर्मा यांनी ही शिक्षा ठोठावली. शासनातर्फे अॅड.अतुल चिद्दरवार यांनी युक्तिवाद केला. (प्रतिनिधी)
पत्नीच्या खून प्रकरणात पतीला पाच वर्र्षे कारावास
By admin | Updated: March 9, 2017 00:09 IST