निधी लाटण्यासाठी शक्कल : खेळाडूंना साडेतीन लाखांचे बक्षीसनीलेश भगत यवतमाळएकीकडे क्रीडांगणे ओस पडत असल्याचे निराशाजनक चित्र आहे, तर दुसरीकडे तीन वर्षांपूर्वी झालेल्या तालुकास्तरीय पायका क्रीडा स्पर्धेत शे-दोनशे नव्हे तर तब्बल पाच हजार खेळाडू सहभागी झाल्याचा दावा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केला आहे. एवढे मोठे खेळाडू खेळलेच कसे, असा प्रश्न निर्माण झाला असून निधी लाटण्यासाठी नवी शक्कल लढविण्यात आल्याचा आरोप होत आहे.यवतमाळ जिल्ह्यात पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियानांतर्गत (पायका) २०१२-१३ मध्ये झालेल्या स्पर्धेचा १३ लाख रुपयांचा निधी या कार्यालयाला नुकताच प्राप्त झाला आहे. हा निधी हडपण्यासाठी आता शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल चार हजार ९२० खेळाडू खेळल्याचा दावा केला जात आहे. यवतमाळातील नेहरू स्टेडियम आणि अभ्यंकर कन्या शाळेत या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. मैदानी, व्हॉलिबॉल, खो-खो, फुटबॉल आदी पाच क्रीडा प्रकारात या स्पर्धा घेतल्याचा दावा आहे. १६ वर्षाखालील मुले-मुली सात सहभागी झाले होते. पायका स्पर्धेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे वैयक्तिक बक्षीस रोख स्वरूपात देण्यात येते. त्याचप्रमाणे तालुकास्तरावर विजयी खेळाडूंना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पुरस्कार दिले जाते. परंतु त्यावेळी निधी प्राप्त न झाल्याने बक्षीस वितरण झालेच नव्हते. दरम्यान, या स्पर्धेच्या बक्षिसासाठी १३ लाख रुपयांचा निधी नुकताच क्रीडा कार्यालयाला प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी झालेल्या या स्पर्धेचा अहवाल एकाही तालुका संयोजकाने दिला नाही. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावरून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात खळबळ उडाली होती. त्यानंतर या निधीचा विनियोग करण्यासाठी नवनवीन शक्कल लढविणे सुरू झाले. त्यातूनच खेळाडूंचा आकडा फुगविण्यात आला. विशेष म्हणजे तालुकास्तरावर मोजकेच खेळाडू सहभागी होतात. तेच खेळाडू जिल्हास्तरावर येतात. मात्र एकाचवेळी पाच हजार खेळाडू खेळण्याची क्षमता दोन्ही ठिकाणची नसताना एवढे मोठे खेळाडू यवतमाळात खेळले कसे, असा प्रश्न क्रीडा वर्तुळात विचारला जात आहे.
पायकात म्हणे पाच हजार खेळाडू
By admin | Updated: March 3, 2016 02:30 IST