पदावनती थांबणार : दीडशे पटसंख्येची अट शिथिल यवतमाळ : दीडशेपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत पाच हजार मुख्याध्यापकांना अतिरिक्त ठरविण्यात आले होते. त्यांची पदावनती करण्यात येणार होती. मात्र आता ही अट शिथिल करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तांनी दिले. त्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापकांना मोठा दिलास मिळणार आहे.पहिली ते सातवी आणि पहिली ते आठवी या शाळांमध्ये दीडशेपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे मुख्याध्यपक पद गोठविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार सर्व जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सर्व्हेक्षण करून अतिरिक्त मुख्याध्यपकाची यादी तयार केली होती. राज्यात तब्बल पाच हजार मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले होते. मुख्याध्यपक म्हणून यांना शासनाकडून अतिरिक्त ग्रेड पे दिला जातो. आता पदावनती होणार असल्याने ग्रेड पे ला कात्री लावली जाणार होती. शिवाय मुख्याध्यापकांना सहायक शिक्षक म्हणून सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.ही बाब प्राथमिक शिक्षक संघाच्या लक्षात येताच त्यांनी सातत्याने पाठपूरावा सुरु केला. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यवतमाळ दौऱ्यावर असताना तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या निर्देशावरून शिक्षण आयुक्त चोकलिंगम आणि शिक्षण संचालक महावीर माने यांनी शिक्षक संघाच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलाविले.शिक्षक नेते शिवाजीराव पाटील, मधुकर काठोळे, बाबासाहेब काळे यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून पटसंख्येची अट शिथील करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यातील पाच हजार मुख्याध्यापकांना जीवदान मिळाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
पाच हजार अतिरिक्त मुख्याध्यापकांवरचे गंडातर टळले
By admin | Updated: August 20, 2014 00:59 IST