बंदूक व १२ काडतूस जप्त : टायगर प्रोटक्शन फोर्सची कारवाई उमरखेड : पैनगंगा अभयारण्यातील वन्यजीवांची शिकार करण्याच्या तयारी असलेल्या पाच जणांच्या टोळक्याला गाडीवन बीटमध्ये स्पेशल टायगर प्रोटक्शन फोर्सने शनिवारी मध्यरात्री जेरबंद केले. त्यांच्याजवळून एक बंदूक, १२ जिवंत काडतूस आणि शिकारीचे साहित्य जप्त केले. संजय विलू आडे (३९), गजू रतन आडे (४५), अर्जुन नानू आडे (३३), बाळू अमर राठोड (२१) सर्व रा. टाकळी ता. उमरखेड आणि जाहीर शॉ खान (४३) रा. किनवट जि. नांदेड अशी अटक करण्यात आलेल्या शिकाऱ्यांची नावे आहेत. पैनगंगा अभयारण्यातील गाडीवन बीटमधील जंगलात शिकारी शिरल्याची माहिती वन विभागाच्या टायगर प्रोटेक्शन फोर्सला मिळाली. त्यांनी ही माहिती खरबीचे वन परिक्षेत्र अधिकारी संदेश पाटील यांना दिली. त्यावरून टायगर प्रोटेक्शन फोर्सचे २५ जवान आणि वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी जंगलात शिकाऱ्यांच्या शोधात निघाले. तेव्हा गाडीवन बीटमधील जंगलातील एका झुडूपातून रात्री १२ च्या सुमारास शिकाऱ्यांनी गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अंधारात लपून असलेल्या या पाचही जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून एक बंदूक, १२ जीवंत काडतुस, तीन धारदार सुरे आदी जप्त करण्यात आले. ही कारवाई वन अधिकारी संदेश पाटील, आर.एम. आडे, आर.एस. बोराडे, डीसीएम टी.पी. पाटील आणि टायगर फोर्सच्या जवानांनी केली. (शहर प्रतिनिधी)
पैनगंगा अभयारण्यात पाच शिकारी जेरबंद
By admin | Updated: September 14, 2015 02:24 IST