२९ ला बक्षीस वितरण : शरच्चंद्र टोंगो जन्मशताब्दी कथास्पर्धायवतमाळ : सातत्याने ६६ वर्षे लिखाण करून सुमारे चार हजार पृष्ठांचे लेखन करणारे दिवंगत शरच्चंद्र टोंगो जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय कथा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २९ आॅगस्ट रोजी येथे होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या स्पर्धेसाठी मुंबई, अहमदनगर, अमरावती, नागपूर, खामगाव आदी जिल्हा व तालुका ठिकाणावरून ३५ कथा प्राप्त झाल्या होत्या. या कथांचे परीक्षण पत्रकार पद्माकर मलकापुरे, कथालेखक प्राचार्य डॉ.देवेंद्र पुनसे, डॉ.शैलजा रानडे, डॉ.रमाकांत कोलते यांनी केले. यातून तीन उत्कृष्ट कथा निवडण्यात आल्या. यामध्ये पहिला पुरस्कार सातारा जिल्ह्यातील कराडचे मिलिंद भागवत यांना ‘चकार’ कथेसाठी जाहीर झाला आहे. द्वितीय पुरस्कार नागपूर येथील मीनाक्षी मोहरील यांच्या ‘फिरुन पुन्हा’ या कथेला मिळाला आहे. तृतीय पुरस्कार मुकुटबन येथील डॉ.अनंता सूर यांच्या ‘रक्ताचं नातं’ या कथेला जाहीर झाला. नागपूरच्या सुभाषिणी कुकडे यांच्या ‘खेळ मांडियेला’ आणि अमरावती येथील अनुश्री काळे यांच्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या कथेला उत्तेजनार्थ बक्षीस घोषित करण्यात आले आहे. या स्पर्धकांना २९ आॅगस्टला येथील लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात दुपारी ३ वाजता होणाऱ्या सोहळ्यात सन्मानित केले जाणार आहे. भाजपाचे राज्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या हस्ते आणि माजी आमदार दिवाकर पांडे यांच्या अध्यक्षतेत बक्षीस वितरण होणार आहे, अशी माहिती आयोजक राजन टोंगो, अभय टोंगो आणि उत्पल टोंगो यांनी दिली. (शहर वार्ताहर)
‘चकार’ला पहिले, ‘फिरून पुन्हा’ दुसरे
By admin | Updated: August 27, 2015 00:10 IST