लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : बोरी येथील धरतीधन बीज प्रक्रिया केंद्रावर शुक्रवारी तीन पथकांनी कारवाई केली. तब्बल सहा तास ही कारवाई चालली. रात्री ११.४५ वाजता या युनिटचे संचालक संजय सोहनलाल मालानी यांच्यावर दारव्हा पोलिसांनी १५ गुन्हे दाखल केले. एक ट्रक जप्त करण्यात आला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्याची यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. फसवणुकीचे हे प्रकार टाळण्यासाठी गस्त वाढविण्यात आली आहे. सोयाबीनसोबत बिटी बियाण्यांवरही करडी नजर ठेवण्यात आली आहे. खरिपाच्या तोंडावर बियाण्यांच्या विक्रीचे प्रमाण बाजारपेठेत वाढले आहेत. याच सुमारास अवैध बियाणे पॅकिंग करणारा कारखानाच उघड झाला. पुणे, अमरावती आणि यवतमाळच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. या ठिकाणी चार कोटी १९ लाख रुपयांचा अवैध साठा उघड झाला. या प्रकरणात पंचायत समिती कृषी अधिकारी राजीव शिंदे आणि तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात यांनी दारव्हा पोलिसात संजय सोहनलाल मालानी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. कारखान्यात पथकाने ज्यावेळी कारवाई केली, त्यावेळी ३० किलोच्या बॅगमध्ये सोयाबीन बियाणे भरले जात होते. या बॅगवर उत्पादक, प्रक्रिया व विपणन कर्ता, कंपनीचे नाव, पत्ता अशा कुठल्याच बाबी नव्हत्या. उगवण शक्ती, भौतिक शुद्धता, बियाणे तपासणी दिनांक, अशा बाबी नव्हत्या. उपलब्ध साठा, केलेली विक्री, त्याबाबतचे देयके, बीजोत्पादनाबाबत माहिती, बीजोत्पादक शेतकरी, यासह अनेक विषयांची माहिती कंपनीने पथकाला दिली. त्याचे कुठलेही दस्तावेज त्यांच्याकडे नव्हते. यामुळे कंपनीने आर्थिक फायद्यासाठी, शासनाची दिशाभूल करून शेतकऱ्यांचीही दिशाभूल केल्याचा आरोप तक्रारीत आहे. यामुळे बियाणे कायदा १९६८, बीज अधिनियम, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, भारतीय दंड संहिता १८६० नुसार विविध १५ कलमान्वये संजय मालानी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
बियाणे विक्री कुठे-कुठे झाली?- जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. अशा प्रकारचे अवैध बियाणे कुठे-कुठे विकल्या गेले, याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मागविली आहे. खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यापासून सावध केले जाणार आहे. अशा प्रकारचे अवैध बियाणे बनविणारा कारखाना आणखी कुठे आहे का, याचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकूणच यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.
जिल्हाभर अलर्ट- बोरी अरबमध्ये अवैध बियाणे पॅकिंग प्रकरणात चार कोटी १९ लाख रुपयांचे बियाणे जप्त केल्यानंतर कृषी विभागाची यंत्रणा अलर्ट झाली आहे. त्यांनी जिल्हयातील १७ पथकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. कुठलाही गैरप्रकार निदर्शनास येताच, थेट कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. खासकरून सोयाबीन आणि बोगस बिटी बियाण्याची तपासणी केली जात आहे. याशिवाय विविध बियाण्यांचे नमुने घेतले जात आहे.टोल फ्री नंबरवर १२ तक्रारी- कृषी विभागाने जाहीर केलेल्या टोल फ्री नंबरवर आतापर्यंत १२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगानेही कृषी विभागाने कारवाई सुरू केली आहे. काही तक्रारी जुन्या आहेत, तर काही खताच्या अतिरिक्त किमतीबाबतही आल्या आहेत.