आर्णी तहसील : उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्वत: केली चौकशीआर्णी : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना डावलून इतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली. खंडाळा गावातील हा प्रकार तलाठ्यामुळेच झाला, अशी ओरड वंचित शेतकऱ्यांनी केली. याप्रकरणी गुरुवारी उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्वत: तहसीलमध्ये येऊन चौकशी केली. त्यावेळी दोनही बाजूच्या शेतकऱ्यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला. खंडाळा गावातील गारपीटग्रस्तांची यादी करताना महिला तलाठ्याने खऱ्या नुकसानग्रस्तांना डावलले. याबाबत वंचित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत गुरुवारी दुपारी १ वाजता उपविभागीय अधिकारी विकास माने हे स्वत: तहसील कार्यालयात आले. त्यांनी तहसीलदार सुधीर पवार यांच्यासह तक्रारकर्ते शेतकरी व लाभ मिळालेले शेतकरी अशा दोनही गटातील शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी दोनही गटातील शेतकरी एकाचवेळी आपला संताप व्यक्त करू लागल्याने गोंधळ उडाला होता. तक्रारीवरून काही शेतकऱ्यांनी पुरावे सादर केले. तक्रारीतील काही बाबी खोट्या आहेत, हे त्यावरून उघड झाले. परंतु गावात भेट देवून प्रत्यक्ष चौकशी केल्याशिवाय खरे काय ते समोर येणार नाही, असे उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले. आता खंडाळा गावात किती गारपीटग्रस्त सुटले आणि किती शेतकऱ्यांचे नाव चुकीने यादीत घुसडण्यात आले, हे चौकशीअंतीच स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या तरी तलाठ्याविरुद्ध रोष व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपविभागीय अधिकारी तहसीलमध्ये आल्यामुळे खंडाळा गावातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती. (शहर प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या संतापाची ‘गारपीट’
By admin | Updated: August 7, 2015 02:21 IST