महागाव(कसबा) : यावर्षी पावसाळा सुरू होवून दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. परंतु आवश्यक असा पाऊस अद्याप झाला नाही. मध्यंतरी एक-दोन वेळा पावसाने हजेरी लावली. यावेळी शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी उरकली. परंतु नंतर मात्र पावसाने दडी मारल्यामुळे दुबार व तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले. परंतु त्यानंतरही यावर्षी शेतकऱ्यांच्या हातात काही येईल याची शक्यता आता जवळपास मावळली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुरांवर दुष्काळाचे प्रचंड सावट उभे ठाकले आहे. येत्या काही दिवसात गोकुळाष्टमी, पोळा व गणेशोत्सव आदी सण येणार आहेत. या सणांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात मात्र निराशा पसरली आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला पोळा हा सणसुद्धा साजरा कसा करावा, या संकटात शेतकरी आहे. पोळ्याला पशुधनाची पूजा करण्याची परंपरा आहे. परंतु सध्या अस्मानी संकटामुळे शेतकरी आहे ते पशुधन विक्री करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी, शेतमजुरांच्याजवळ दमडीही शिल्लक नाही. याचा थेट परिणाम बाजारपेठांवरही दिसून असला आहे. दरवर्षी महिनाभरापूर्वीच पोळ्याच्या खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात दिसणारी गर्दी यावर्षी मात्र दिसून येत नाही. गुराढोरांना चारा नाही, प्यायला पाणी नाही, शेतकऱ्यांकडे असलेला चारा आता जवळपास संपला आहे. शासनाकडून चाराडेपो सुरू करण्यात आलेले नाही. अशा सर्व दुष्टचक्रात शेतकरी सापडला आहे. बँकांनी कर्ज देण्यास नकार दिल्याने अनेकांनी सावकारांकडून कर्ज घेवून दुबार व तिबार पेरणी केली आहे. आता मात्र सावकारसुद्धा थांबायला तयार नाहीत. डोक्यावरील कर्ज कसे फेडावे, हीसुद्धा काळजी शेतकऱ्यांना सतावत आहे. शेतमजुरांचीही हीच परिस्थिती आहे. पावसाने एकदम डोळे टवकारल्याने शेतात मजुरांना कोणतीही कामे उरली नाही. त्यामुळे मजूर वर्गावर उपासमारीची पाळी आली आहे. शासनाने शेतकरी, शेतमजुरांना त्वरित मदत जाहीर करावी किंवा रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून त्यांच्या हाताला काम द्यावे, जेणेकरून यातून मिळणाऱ्या मजुरीतून त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटू शकेल, अशी मागणी होत आहे. जनावरांसाठी चारा डेपोची अत्यंत गरज असतानासुद्धा पशुसंवर्धन व महसूल विभाग याकडे लक्ष देण्यासाठी तयार नाही. याबाबतची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांनी तलाठ्याला दिली असताना वरिष्ठांकडून मात्र कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. ग्रामीण भागात कुणीही राजकीय पुढारी सध्या भटकायला तयार नाही. कुणालाही जनतेचे सोयरसुतक राहिलेले नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांबाबत ग्रामीण जनतेत प्रचंड रोष दिसून येत आहे. कृषीप्रधान ग्रामीण भागाची भाषा प्रत्येक भाषणातून बोलून दाखविणारे नेते आज कृषीवरील संकटाबाबत विचारपूस करायलाही तयार नाही.लोकप्रतिनिधींनी आता विधानसभेची तयारी चालविली आहे. त्यासाठी ग्रामीण कार्यकर्त्यांना त्यांनी कामाला लावले आहे. परंतु शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. अशा लोकप्रतिनिधींबाबत ग्रामीण जनतेत प्रचंड रोष व्यक्त होत असून शासनाने त्वरित मदत जाहीर करावी, अशी मागणी महागाव(कसबा) परिसरातून शेतकरी, शेतमजुरांमधून होत आहे. (वार्ताहर)
शेतकरी-शेतमजुरांवर दुष्काळाचे सावट
By admin | Updated: August 14, 2014 23:57 IST