शिंदोला : नव्या केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरण आणि निसर्गाचा लहरीपणा, यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. नेहमीच नव्या आशेवर जगणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवन निराशमय झाले आहे.बहुप्रतीक्षेनंतर केंद्रात भाजपाची सत्ता आली. काँग्रेस आघाडीकडून निराशा पदरी पडलेल्या सर्व स्तरावरील मतदारांनी भाजपाच्या पारड्यात मोठ्या आशेने भरभरून मते टाकली. भाजपाच्या यशात शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. परंतु अवघ्या अल्प कालावधीतच जगाचा पोशिंदा केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाने निराश झाला आणि हेच का ‘अच्छे दिन’, म्हणून स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करताना दिसून येत आहेत.पूर्वी केंद्रात अन् राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना विरोधी पक्षातील भाजपाचे नेते आंदोलनाच्या माध्यमातून तत्कालीन सरकारवर आसूड ओढायचे़ जणू आम्हीच शेतकऱ्यांचे खरे कैवारी आहोत, असे ते दाखवायचे़ मात्र केंद्रात सत्ता स्थापन होताच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, परिस्थितीवर साध्या प्रतिक्रियादेखील प्रसार माध्यमांसमोर व्यक्त करून शेतकऱ्यांना दिलासा देताना आता ते दिसत नाही़ मोठ्या अपेक्षेने मोदी सरकारकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याचे चित्र शेतकऱ्यांत दिसून येत आहे़चालू हंगामात उशीरा सुरू झालेल्या आणि अपुऱ्या पावसामुळे खरीप उत्पादनात लक्षणीय घट येत आहे. जमिनीत ओलावा नसल्यामुळे रबी हंगामही पूर्णपणे धोक्यात सापडला आहे़ सोयाबीन, कापूस या खरीप पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्यानंतर रबी पिकांना पोषक वातावरण नसल्यामुळे रबी उत्पादनातही घट येण्याची दाट शक्यता आहे़ दरवर्षीपेक्षा उत्पादनात घट होऊनही मात्र शेतमालाच्या भावात ३० ते ४० टक्क्यांची घट झाली आहे़ महासंघाने कापूस खरेदी सुरू न केल्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांच्या अडचणीचा लाभ घेत हमी भावापेक्षा कमी भावात सर्व शेतमालाची खरेदी करीत आहे़ (वार्ताहर)
शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी आले मेटाकुटीस
By admin | Updated: November 10, 2014 22:51 IST