गुन्हा दाखल : १० लाखांच्या कर्जासाठी यावलीच्या शेतकऱ्याने काढला चार लाखांचा विमा अकोलाबाजार : शेतात ग्रीन शेड नेट उभारण्यासाठी १० लाखांच्या कर्जासाठी एका शेतकऱ्याकडून चार लाख रुपयाचा विमा हप्ता भरुन घेतल्यानंतरही त्याला कर्ज देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने वडगाव जंगल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी चार कंपन्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.योगेश दीपक राठोड रा. यावली असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांना कृषी विभागाच्यावतीने ग्रीन शेड नेट मंजूर झाले. यासाठी त्यांना पुणे येथे प्रशिक्षणासाठी पाठविले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ग्रीन शेडनेट उभारण्यासाठी साडेचार लाख रुपयांची गरज होती. यासाठी त्यांनी बँकाचे दार ठोठावले. परंतु बँकांनी नकार दिला. नातेवाईकांनीही पैसे देण्यास टाळाटाळ चालविली. अशा परिस्थितीत त्याला एक फोन आला. या फोनवर कमी व्याजदरात दहा लाख रुपये देण्याचे आमिष दिले. त्यासाठी त्याला संबंधित कंपनीची विमा पॉलिसी काढण्याचे सांगण्यात आले. मुंबई येथील विशाल आणि अविनाश या दोन तरुणांनी ३ फेब्रुवारीपासून सारखे फोन करून विमा काढण्याचा सल्ला देत होते. नागपूर अथवा यवतमाळच्या संबंधित कंपनीच्या कार्यालयात साधू नका, तुम्हाला कमिशन मिळणार नाही, असेही सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन चार कंपन्यांचे एक-एक लाख रुपयांचा विमा हप्ता भरला. चार लाख रुपये भरल्यानंतर त्याला तीन कंपन्यांनी बॉन्डही पाठविले. परंतु कर्जासाठी त्याने संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचे फोन बंद येत होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच योगेशने वडगाव जंगल पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सदर कंपन्यांनी पाठविलेले बॉन्ड खरे की खोटे हेही समजायला मार्ग नाही. तसेच विमा हप्ता भरलेली एक कंपनीही बनावट असल्याचे पुढे आले आहे. (वार्ताहर)
कर्जाच्या नावाखाली शेतकऱ्याची फसवणूक
By admin | Updated: December 21, 2015 02:37 IST