राळेगाव येथे निवेदन सादर : आर्थिक सहकार्य आणि हाताला काम देण्याची मागणीराळेगाव : तालुक्यातील शेतकरी आणि शेतमजुरांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना सोबतच शेतमजुरांनाही अनेक समस्या भेडसावत आहे. शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत आणि शेतमजुरांना कामे उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तहसीलसमोर धरणे देऊन निवेदन सादर करण्यात आले.दीड महिना पावसाचा खंड आणि दीर्घ विश्रांतीनंतर पावसाचा अतिरेक यामुळे सोयाबीन, कापूस आदी पिकांची नासाडी झाली. शेतकरी हवालदिल झाला. सोबतच मजुरांच्या हाताला काम मिळाले नाही. तालुक्यात रोजगाराची पर्यायी संधी नसल्याने मागील दोन महिन्यांपासून शेतमजूर कामासाठी भटकत आहे. रोजगाराच्या मागणीसाठी गेल्या महिन्यात नगरपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयाला निवेदन देण्यात आले होते. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे मजुरांनी तहसीलसमोर धरणे देऊन निवेदन सादर केले.यावेळी मजुरांच्यावतीने रोजगार मागणी अर्जाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत म्हणून हेक्टरी २५ हजार रुपये प्रमाणे किमान दोन हेक्टरपर्यंत ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. प्रसंगी आंदोलनकर्त्यांना प्रा. प्रकाश देवघरे यांनी संबोधित केले. जिल्हा परिषद सदस्य मिलिंद धुर्वे, बेंबळा कालवे संघर्ष समितीचे तालुका प्रमुख सुधीर जवादे यांनीही मार्गदर्शन केले. प्रश्न निकाली न काढल्यास शेतकरी-शेतमजुरांचा लढा तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी दादाजी नागोसे, युसुफ अली सैयद आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
शेतकरी, शेतमजूर तहसीलवर धडकले
By admin | Updated: October 7, 2015 03:05 IST