बच्चू कडू : हमी भावासह कर्जमाफीसाठी आंदोलनयवतमाळ : शेतमालाला हमी भाव आणि संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन देऊन भाजपा सत्तेत आली. आता मात्र त्यांनी शब्द फिरविला असून शेतकऱ्यांसाठी पैसा नसल्याचे सांगत आहेत. एकीकडे राज्य शासन बुलेट ट्रेनसाठी २५ हजार कोटींची तरतूद करीत आहे. केंद्रातील सरकार जाहिरातींवर एक लाख ६८ हजार कोटी खर्च करते आणि दुसरीकडे शेतमालाला भाव देणे, कर्जमाफी करणे शक्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करीत आहे. अशा सरकारचा निषेध व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नागपूर ते वडनगर अशी शेतकरी आसूड यात्रा आयोजित केल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. या यात्रेदरम्यान १२ एप्रिल रोजी यवतमाळात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबार आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या घरापासून पंतप्रधानांच्या गावापर्यंत शेतकरी आसूड यात्रा जाणार आहे. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीच्या मुहूर्तावर यात्रेची सुरुवात केली जाणार आहे. २२ एप्रिल रोजी या यात्रेचा गुजरातमधील वडनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गावात समारोप केला जाणार आहे. ही यात्रा नागपूरवरून पवनार आश्रम, बापूकुटीला भेट देऊन यवतमाळात ११ एप्रिलला मुक्कामी राहणार आहे. शेतकरी दरबारात विविध समस्या घेऊन उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. या आंदोलनात प्रहारचे जिल्हा प्रमुख व आंदोलनाचे संयोजक प्रमोद कुदळे यांनी दिली. यावेळी नितीन महल्ले, आशिष तुपटकर, आकाश समोसे आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)
शेतकरी आसूड यात्रेचा जनता दरबार
By admin | Updated: March 27, 2017 01:17 IST