४१० वाहनांवर कारवाई : ५२ हजारांचा दंड यवतमाळ : परिवहन नियमांची पायमल्ली करीत फॅन्सी नंबर प्लेट लावणारे वाहन चालक आणि बसस्थानक परिसरातून अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहने सध्या पोलिसांच्या निशाण्यावर असून दोन दिवसात ४०० दुचाकी आणि ११० अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ५२ हजार रुपये दंड अर्थात तडजोड शुल्क वसूल करण्यात आला आहे.यवतमाळ शहरात अलीकडे फॅन्सी नंबर प्लेटची क्रेझ तरुणांमध्ये वाढली आहे. आपल्या वाहनाच्या क्रमांकातून नावे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातूनच दादा, भाऊ, मॉ यासोबतच स्वत:चे नाव आणि आडनावही या क्रमांकातून शोधून ते नंबर प्लेटवर लावले जात आहे. मोठ्या तोऱ्यात चालणारे हे वाहन चालक सुसाट वेगाने शहरातून जात असतात. परंतु त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. त्यामुळे अनेकांचे मनोबल वाढले. या नावांच्या नंबर प्लेटसह फॅन्सी नंबर प्लेट मोठ्या प्रमाणात वाहन चालक तयार करू लागले. परंतु शनिवारपासून यवतमाळ वाहतूक शाखेने धडक मोहीम हाती घेतली आहे. फॅन्सी नंबर प्लेट आणि सुसाट दुचाकी चालविणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करणे सुरू केले आहे. अवघ्या दोन दिवसात शहरात ४१० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला आहे. यासोबतच यवतमाळ बसस्थानक परिसर हा नो पार्किंग झोन असून या ठिकाणाहून अवैध प्रवासी वाहतूक करणे नियमबाह्य आहे. परंतु गत काही वर्षांपासून खासगी बसेस आणि इतर वाहने बसस्थानक परिसरात जोरजोराने ओरडून प्रवासी घेत होते. त्यांच्यावरही आता वाहतूक शाखेने बडगा उगारला आहे. २०० मीटर परिसरात आढळलेल्या तब्बल ११० वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. यवतमाळ शहरात ही मोहीम कायम स्वरूपी सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.आता फॅन्सी नंबर प्लेटपाठोपाठ हेल्मेट सक्तीचाही बडगा वाहन चालकांवर येणार असून नियमाने वाहन चालविले नाही तर दंडाची तयारी ठेवावी लागेल. (शहर वार्ताहर)
फॅन्सी नंबर प्लेट दुचाकी पोलिसांचे निशाण्यावर
By admin | Updated: February 15, 2016 02:31 IST