मशीनचे सर्व मानक अपूर्णच : पुढील निवडणुकीनंतर पेपर ट्रेलरयवतमाळ : निवडणुकीकरिता वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनमध्ये हेराफेरी करणे सहज शक्य आहे. यामुळे लोकशाहीला वाचवायचे असेल, तर ईव्हीएम मशीन हद्दपार करावी, अशी मागणी रेटून राष्ट्रव्यापी लोकतंत्र बचाओ आंदोलन समितीने ७२ तासांचे देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. स्थानिक तिरंगा चौकामध्ये राष्ट्रव्यापी लोकतंत्र बचाओ अांदोलन समितीच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्यात आले. ईव्हीएम मशिनच्या वापरासाठी अंतरराष्ट्रीयस्तरावर ७ मानक निश्चित करण्यात आले आहेत. ते निकष अद्यापही पूर्ण झाले नाही. एखाद्या उमेदवाराने आक्षेप नोंदविला, तर या प्रक्रियेत पुन्हा मतमोजणीची तरतूद नाही. या मशीन संदर्भात २००४ मध्ये आक्षेप नोंदविला गेला आणि न्यायालयात याचिका दाखल झाली. न्यायालयाने केंद्र शासनाला या मशिनला पेपर ट्रेल बसविण्याच्या सूचना दिल्या. मात्र त्यासाठी निवडणूक आयोगाने ३० महिन्यांचा अवधी मागितला.या ३० महिन्यांत २०१९ च्या निवडणूका संपून जाणार आहे. उत्तरप्रदेशमध्ये पेपर ट्रेल ज्या ठिकाणी लावण्यात आले, त्या ठिकाणी भाजपाचा पराभव झाला, असा दावा आंदोलकांनी केला आहे. यामुळे ईव्हीएम मशीन संशयाच्या भोवऱ्यात आहे. अनेक प्रगत देशांसोबत ज्या देशात ईव्हीएम मशिनची निर्मिती होते, त्या देशांत मशिनचा वापर होत नाही. यामुळे देशातुन ईव्हीएम हद्दपार करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. आंदोलनाचे नेतृत्व राज्यव्यापी लोकतंत्र बचाव समितीचे जिल्हा संयोजक विजयराज शेगेकर यांनी केले. यावेळी संजय कोरडे, अॅड. अनिल किन्नाके, सारिका भगत, भाग्यश्री तिरमारे, अर्चना कयापाक, इंदूताई मोहर्लीकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. हे आंदोलन सतत ७२ तास चालणार आहे. (शहर वार्ताहर)
ईव्हीएम हटाव आंदोलन
By admin | Updated: March 26, 2017 01:16 IST